पुणे : महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेतील (टीईटी) काही उमेदवारांचा निकाल राखीव ठेवण्यात आला होता. आता या उमेदवारांची २५ मार्च ते दिनांक ४ एप्रिल या कालावधीत सुनावणी घेतली जाणार असून, सुनावणीनंतर पुढील निर्णय घेतला जाणार आहे.
परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी या बाबतची माहिती दिली. राज्य परीक्षा परिषदेतर्फे १० नोव्हेंबर २०२४ रोजी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा राज्यभरात घेण्यात आली होती. ही परीक्षा दिलेल्या ७८६ उमेदवारांचा निकाल राखीव ठेवण्यात आला होता. आता या उमेदवारांची सुनावणी घेतली जाणार आहे. त्या अनुषंगाने सुनावणीसाठी उपस्थित रहाण्याबाबतचे नियोजन उमेदवारांच्या ई-मेलसह लघुसंदेश, परीक्षा प्रणालीतील उमेदवारांच्या ऑनलाइन खात्यामध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे. उमेदवारांना या सुनावणीला स्वखर्चाने उपस्थित राहावे लागणार आहे.
उमेदवारांना दिलेल्या दिवशी समक्ष हजर न राहिल्यास या प्रकरणी उमेदवाराला काही सांगायचे नाही, असे गृहीत धरून त्याबाबत उपलब्ध पुराव्याच्या आधारे निर्णय घेण्यात येईल आणि तो निर्णय बंधनकारक राहील याची नोंद घ्यावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
सुनावणीच्या वेळी आधारकार्ड, शिक्षक पात्रता परीक्षा २०२४ मधील उत्तरपत्रिकेची कार्बन प्रत, परीक्षेचे प्रवेशपत्र, पुराव्यासाठी परीक्षेच्या संदर्भातील आवश्यक असलेले अनुषंगिक सर्व कागदपत्रे, गुणपत्रक प्रमाणपत्र तसेच चालक परवाना, बँक पासबुक, निवडणूक ओळखपत्र, पासपोर्ट यापैकी कोणतेही एक छायाचित्र ओळखपत्र यासह उमेदवाराने स्वतः उपस्थित राहणे आवश्यक आहे. सुनावणीवेळी उमेदवाराच्या वतीने अन्य कोणालाही उपस्थित राहता येणार नाही, याची नोंद घ्यावी, असे ओक यांनी सांगितले.