पुणे : ठाकरे सरकारच्या काळात महाराष्ट्र उद्योगांत पिछाडीवर गेला. मोठय़ा उद्योगपतीच्या घराखाली स्फोटके आणून ठेवणारे पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना पुन्हा सेवेत घेण्यात आले. व्हिटारा कंपनीच्या यवतमाळमधील प्रकल्पाला जमीन मिळण्यासाठी तत्कालीन उद्योगमंत्र्यांनी ‘नेत्यांना’ भेटावे लागेल, असे सांगत आढेवेढे घेतले होते, असे आरोप उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुण्यात पत्रकारांशी बोलताना त्यांनी ठाकरे यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, जगातील मोठय़ा उद्योगपतीच्या घराखाली स्फोटके ठेवून घातपाताचा प्रयत्न करण्यात आल्याने महाराष्ट्रात उद्योग आणणे जिकिरीचे होऊ शकते, असे उद्योजक सांगत आहेत. २०२१ मध्ये साडेआठ हजार कोटींचा व्हिटारा कंपनीचा प्रकल्प यवतमाळमध्ये आला. कंपनीला ४७ हेक्टर शासकीय जागा देण्याबाबत सामंजस्य करार झाला. मात्र, प्रत्यक्षात जमीन मिळण्यासाठी बूट झिजवावे लागले. आता दोन दिवसांत ४७ हेक्टर जमीन देण्याचा निर्णय आम्ही घेतला. ३० ऑक्टोबरला यवतमाळमध्ये जमिनीचा करार कंपनीशी केला जाणार आहे.

हेही वाचा >>> अजित पवार गट सत्तेत का सहभागी झाला? देवेंद्र फडणवीस यांनी दिलं उत्तर, म्हणाले…

परदेशी गुंतवणुकीत मागे गेलेला महाराष्ट्र मुख्यमंत्री शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यामुळे पुन्हा देशात पहिल्या क्रमांकावर आणण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत.

नवी मुंबईत हिरे, ज्वेलरी हब

हिरे आणि ज्वेलरी पार्क याबाबत संभ्रम निर्माण केला जात आहे. नवी मुंबईत हिरे, ज्वेलरीसाठी नवीन हब तयार होत आहे. सर्व सोयीसुविधा देण्यात येत आहेत. केंद्राच्या अनुदानातून १०० कोटी रुपये मिळत आहेत. या उद्योगात तरुणांना प्रशिक्षण सुरू करण्यात येणार आहे. पुढील दोन वर्षांत मोठा हिरे, ज्वेलरी हब नवी मुंबईत होईल. त्यामुळे मुंबईतून हा हब दुसरीकडे कुठे जायचा प्रश्न नाही, असे डायमंड ज्वेलरी पार्कच्या अध्यक्षांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले असल्याचे सामंत म्हणाले.

‘आदित्य ठाकरे खोटे बोलत आहेत’

यवतमाळच्या दौऱ्यावर गेल्यानंतर व्हिटारा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी जमीनच मिळाली नसल्याचे सांगितले. तत्कालीन उद्योगमंत्र्यांनी जमिनीबाबत विचारल्यावर नेत्यांना भेटावे लागेल, असे सांगत आढेवेढे घेतले. ही ४७ हेक्टर जमीन देण्याचा निर्णय आमच्या सरकारने घेतला आहे. त्यामुळे सामंत यांना उद्योग खाते कळत नाही, म्हणणारे खोटे बोलत आहेत, अशा शब्दांत सामंत यांनी आदित्य ठाकरे यांचे नाव न घेता टीका केली.