पिंपरी : चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत पक्ष आदेशाविरोधात काम केल्याचा ठपका ठेवत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या चिंचवड विधानसभेच्या महिला संघटिका अनिता तुतारे यांच्यासह पदाधिकाऱ्यांची केलेली हकालपट्टी मागे घेण्यात आली आहे. चिंचवडमधील सर्व पदाधिकारी शिवसेनेतच असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बंडखोरी करूनही कलाटे यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. त्यातच पदाधिकाऱ्यांवरील हकालपट्टी मागे घेतल्याने ठाकरे गटाचा बंडखोर कलाटे यांना छुपा पाठिंबा आहे का, अशी चर्चा सुरू झाली आहे. शहरप्रमुख सचिन भोसले, जिल्हाप्रमुख गौतम चाबुकस्वार यांनी ८ पदाधिकाऱ्यांची २० फेब्रुवारी रोजी हकालपट्टी केली होती. त्यामध्ये चिंचवड विधानसभा संघटक अनिता तुतारे, उपशहर संघटक रजनी वाघ, विभाग संघटक शिल्पा आनपान, उपशहरप्रमुख नवनाथ तरस, विभागप्रमुख प्रशांत तरवटे, हनुमंत पिसाळ, पिंपरी विधानसभा संघटक गणेश आहेर, रवि घाटकर यांचा समावेश होता.

हेही वाचा >>> पोटनिवडणुकीत लाखोंची उधळण, कसब्यात भाजपचे हेमंत रासने, तर चिंचवडमध्ये ‘राष्ट्रवादी’चे नाना काटेंकडून सर्वाधिक खर्च

हे पदाधिकारी अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांचा प्रचार करत करत असल्याचा ठपका ठेवत हकालपट्टी केली होती. त्यावर पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयातून खुलासा करण्यात आला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने सर्व पदाधिकारी हे पक्षातच असून, त्यांना दिलेली जबाबदारी ते प्रामाणिकपणे पार पाडतील, असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

हेही वाचा >>> कसबा, चिंचवड पोटनिवडणूक: प्रचारात गुंठेवारीचा प्रश्न ऐरणीवर, मतदानाआधी न्यायालयाच्या निकालाची शक्यता

कलाटे यांना पाठिंबा?

 राहुल कलाटे शिवसेनेचे माजी नगरसेवक आहेत.  महाविकास आघाडीत विधानसभा पोटनिवडणुकीत चिंचवडची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसने नाना काटे यांना उमेदवारी दिली. त्यामुळे कलाटे यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, संपर्क नेते सचिन अहिर, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विनंती करूनही कलाटे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही. बंडखोरी कायम ठेवली. बंडखोरी केल्याने कलाटे यांचा शिवसेनेशी काही संबंध नाही. त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे अहिर यांनी सांगितले होते;पण अद्यापही कलाटे यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. त्याउलट कलाटे यांचा प्रचार केल्याचा ठपका ठेवत स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केलेली हकालपट्टी मागे घेतली आहे. त्यामुळे ठाकरे गटाचा कलाटे यांना छुपा पाठिंबा असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thackeray group backs expulsion of office bearers women thackeray group supports rahul kalate pune print news spt 17 ysh
Show comments