पुणे : प्रसिद्ध स्टॅण्डअप कॉमेडिअन कुणाल कामरा याने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे एका गाण्यामार्फत विडंबन केले. या गाण्यात कुणाल कामरा याने एकनाथ शिंदेंचा उल्लेख गद्दार असा केला आहे. हे गाणं सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी कुणाल सरमळकर आणि राहुल कनाल यांनी खार येथील दि हॅबिटेट स्टुडिओमध्ये जाऊन तोडफोड केली. तर या प्रकरणावरुन मागील तीन दिवसांपासून शिंदे आणि ठाकरे गटातील नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप पाहण्यास मिळत आहे. या सर्व घडामोडींदरम्यान पुण्यातील अलका टॉकीज चौकात ठाकरे गटाकडून ठाणे, रिक्षा, चष्मा, दाढी, गुवाहाटी आणि गद्दार या शब्दांना महाराष्ट्रात बंदी आहे का…? या आशयाचा मजकूर असलेला फ्लेक्स लावण्यात आला आहे. तर या फ्लेक्सबाजीच्या माध्यमातून ठाकरे गटाकडून शिंदे गटाला डिवचण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे. आता यावर शिंदे गटाकडून नेमकी काय प्रतिक्रिया येते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मी कोणालाही घाबरत नाही : कुणाल कामरा

प्रसिद्ध स्टॅण्डअप कॉमेडिअन कुणाल कामरा याने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे एका गाण्यामार्फत विडंबन केले होते. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी कुणाल कामराला समन्स बजावलं होतं आणि चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलं होतं. मात्र कुणाल कामरा हजर राहिला नाही. त्याचदरम्यान कुणाल कामरा म्हणाला, मी एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची माफी मागणार नाही. मी कोणालाही घाबरत नाही. मी माझ्या पलंगाखाली लपून बसलेलो नाही. माझ्या पुढच्या कार्यक्रमाचं ठिकाण असं असेल जे पाडण्याची अधिक गरज आहे. मी एल्फिन्स्टन ब्रिज किंवा मुंबईतील अशा इमारतीची निवड करेन जी पाडण्याची गरज आहे. अशी पोस्ट त्याने केली होती.