पुणे : दिल्लीत ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरु आहे. या संमेलनात ‘असे घडलो आम्ही’ या कार्यक्रमादरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की, एक पद मिळायचं, असं वादग्रस्त विधान शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले. त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

नीलम गोऱ्हे यांच्या या विधानानंतर ठाकरे गटाचे शिवसैनिक आक्रमक झाल्याचं पाहण्यास मिळत असून पुण्यातील शिवाजीनगर भागातील मॉडेल कॉलनी येथील उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या निवासस्थानाबाहेर ठाकरे गटाकडून आंदोलन करण्यात आले. ‘शिवसैनिकांकडून स्वतःच्या गाडीचे टायर बदलून घेणार्‍या टायरवाल्या काकू, तुमच्या काळ्या टायरचा जाहीर निषेध’ अशा आशयाचा मजकूर असलेला फ्लेक्स घेऊन महिला कार्यकर्त्या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.

यावेळी महिला आघाडीच्या नेत्या रेखा कोंडे म्हणाल्या, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांनी नीलम गोऱ्हे यांना विधान परिषदेवर सलग चार वेळा पाठविले. नीलम गोऱ्हे यांना पक्षाने सर्व काही दिले, पण त्या शेवटी गद्दार गटात गेल्याच पण त्याही पुढे जाऊन नीलम गोऱ्हे यांनी आज उद्धव ठाकरे यांच्या बद्दल जे विधान केले आहे आम्ही त्याचा निषेध व्यक्त करीत असून, नीलम गोऱ्हे यांनी नाक घासून माफी मागितली पाहिजे, अन्यथा यापुढे अधिक तीव्र आंदोलन करू, असा इशारादेखील त्यांनी यावेळी दिला.

Story img Loader