लोकसत्ता प्रतिनिधी
पिंपरी : सिंचन खात्यात ७० हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप भाजपनेच केले होते. एकवेळ लग्न करणार नाही मात्र, राष्ट्रवादीबरोबर कधीच युती करणार नाही, असे जाहीरपणे सांगणारे आता राष्ट्रवादी (अजित पवार गटा)च्या नेत्यांच्या मांडीला मांडी लावून भाजपचे नेते बसली असल्याचा आरोप करत ठाकरे गटाचे पुणे जिल्हा संपर्क प्रमुख, आमदार सचिन अहिर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला. तसेच आम्ही हे सर्व मुद्दे जनतेसमोर घेऊन जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
पिंपरी बोलताना अहिर म्हणाले, इतर तीन राज्याच्या विधानसभा निवडणुकीत काय झाले, यापेक्षा महाराष्ट्रात काय झाले, ही राज्यातील जनता उघड्या डोळ्याने बघत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून कसे घालवले, कशा प्रकारे शिवसेना, राष्ट्रवादीत फूट पाडली, हे भाजपचे पाप जनतेने पाहिले आहे. भाजपने राजकीय दृष्टीकोनातून नाही तर महाराष्ट्र व्देषातून हे कृत्य केले आहे. या सर्व गोष्टींचा हिशोब महाराष्ट्रातील जनता आगामी निवडणुकीत घेतल्याशिवाय राहणार नाही.
आणखी वाचा-धक्कादायक : राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा
भाजपचे सबका साथ, सबका विकास हे घोषवाक्य एकाच समाजापुरते कसे राहू शकते. भारताचा, राजकीय, सामाजिक, ऐतिहासिक वारसा पाहिल्यानंतर सर्व जाती-धर्मातील लोकांना सहभागी केल्यानंतरच हे राज्य, देश महासत्ता होऊ शकते, असे सांगत अहिर म्हणाले, संकुचित विचाराने देशाची आर्थिक, सामाजिक प्रगती होणार नाही. त्यामुळे भाजपची ही फसवी भूमिका आहे.
कर्नाटकामध्ये ओबीसीबद्दल बोलायचे, राजस्थानमध्ये राजपुत, ठाकुरांबद्दल बोलायचे आणि जातीवाद करण्याचे सांगायचे. एकीकडे नवाब मलिकांना महायुती घेण्यास विरोध करायचा आणि दुसरीकडे प्रफुल्ल पटेल यांना कोणताही विरोध नाही. भाजपने ही दुटप्पी भूमिका बंद करावी.
आणखी वाचा-पुणे : पत्नीला भेटायला गेलेल्या जावयाला सासुरवाडीत बेदम मारहाण
…तर सर्वोच्च न्यायालयात धाव घ्यावी लागेल!
१६ आमदार अपात्रतेचा निर्णय सर्वोच्य न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार विधानसभा अध्यक्षांना ३१ डिसेंबरपूर्वी घ्यावा लागेल. अध्यक्षांनी घटनेला धरून निर्णय न घेतल्यास आम्हाला सर्वोच्च न्यायालयात धाव घ्यावी लागेल, असा इशाराही अहिर यांनी यावेळी दिला.