पिंपरी पालिकेच्या भोसरीतील रुग्णालयात लिफ्टमध्ये गतिमंद महिलेवर झालेल्या बलात्काराच्या घटनेचे तीव्र पडसाद मंगळवारी स्थायी समितीच्या बैठकीत उमटले. या घटनेचा निषेध करून समिती सभा तहकूब करण्यात आली. या घटनेतील आरोपी असलेल्या ‘वॉर्ड बॉय’ला निलंबित करण्याचे आदेश आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी मंगळवारी दुपारी दिले.  
स्थायी समितीचे अध्यक्ष नवनाथ जगताप यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत सुनीता वाघेरे यांनी भोसरीतील घटनेच्या निषेधार्थ तहकुबी मांडली, त्यास सर्वच सदस्यांनी अनुमोदन दिले. या वेळी झालेल्या चर्चेत जगताप यांच्यासह महेश लांडगे, चंद्रकांत वाळके, आशा शेंडगे, विनया तापकीर आदींनी घटनेचा तीव्र निषेध केला. पालिका शाळा व रुग्णालयांमध्ये खासगी कंपन्यांचे सुरक्षारक्षक नेमू नयेत, पालिका कर्मचारीच नियुक्त करावेत, अशी सूचना महेश लांडगे यांनी केली. महिला वॉर्ड असल्यास तेथे महिला कर्मचारी असावेत, अशी सूचना आशा शेंडगे, विनया तापकीर यांनी केली. सुरक्षारक्षक म्हणून माजी स्वातंत्र्यसैनिकांचा प्राधान्याने विचार करावा, असे मत चंद्रकांत वाळके यांनी मांडले. शकुंतला धराडे यांनी पिंपळे गुरव व सांगवीतील पाणीटंचाईच्या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. या घटनेतील आरोपी शैलेश जाधव यावर दाखल झालेल्या फौजदारी कारवाईची माहिती पालिका प्रशासनाला प्राप्त झाल्यानंतर दुपारी त्यास निलंबित करण्यात आले.
याशिवाय, अन्य एका प्रकरणात महिला सफाई कर्मचाऱ्याचा विनयभंग करणाऱ्या लिपिकासही निलंबित करण्यात आले. भगवान कापसे असे त्यांचे नाव आहे. यशवंतराव चव्हाण रुग्णालयात खासगी कंपनीच्या महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग केल्याचा आरोप कापसेवर आहे. संबंधित महिलेने तक्रार केल्यानंतर या प्रकरणाची चौकशी झाली व त्यात कापसे दोषी आढळून आले. त्यानुसार, त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.
‘सीसीटीव्हीसाठी विनामूल्य सहकार्य करा’
शहरात सीसीटीव्ही बसवताना आकारण्यात येणारी रस्ते खोदाई व अन्य प्रकारची शुल्कआकारणी माफ करण्याचा प्रस्ताव ऐन वेळी स्थायी समिती सभेत मांडण्यात आल्यानंतर त्यास मंजुरी देण्यात आली. सीसीटीव्ही केबल टाकण्यासाठी शुल्क आकारू नये, ते काम पूर्ण झाल्यानंतर पालिकेने रस्ता पूर्ण करावा, त्यासाठी विनामूल्य सहकार्य करावे, असे प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे.

Story img Loader