ठिकाण पोलीस आयुक्तालाय.. कार्यक्रम वाहतूक शाखेसाठी बांधण्यात आलेल्या संस्कार भवनाचे उद्घाटन.. पण, उपस्थितांमध्ये काँग्रेसचेच नेते आणि कार्यकर्त्यांची गर्दी.. हा कार्यक्रम पोलीस आयुक्तालयातील असूनही कार्यकर्ते आणि नेत्यांचा गर्दीमुळे काँग्रेसचा मेळावा असल्याचे चित्र गुरुवारी दिसत होते.
आमदार मोहन जोशी यांच्या निधीतून पोलीस आयुक्तालयात बांधण्यात आलेल्या संस्कार भवनाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज करण्यात आले. त्या वेळी आमदार मोहन जोशी, रमेश बागवे, माजी आमदार उल्हासदादा पवार, उपमहापौर सुनील गायकवाड, शहराध्यक्ष अभय छाजेड हे सर्व काँग्रेसचे नेते आणि काँग्रेसचे कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते. त्याच बरोबर महापौर चंचला कोद्रे आणि ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव, पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ आदी उपस्थित होते.
कार्यक्रम ५० मिनिटेच चालला आणि त्यामध्ये सर्वाधिक बोलले ते काँग्रेसचे आमदार मोहन जोशीच. या वेळी आमदार जोशी यांनी पुण्याच्या प्रश्नांचा पाढा वाचून दाखविला. ते सोडविण्यासाठी मुख्यमंत्र्यांना गळ घातली. त्याच बरोबर मुख्यमंत्री पुण्याच्या प्रश्नाकडे जातीने लक्ष देत असल्याचे सांगितले. मुख्यमंत्र्यांना वेळ नसल्यामुळे त्यानंतर दुसऱ्या कोणालाही बोलण्याची संधी मिळाली नाही. पोलीस आयुक्तसुद्धा श्रोतेच बनले होते आणि ‘वेळ नसल्यामुळे थेट मुख्यमंत्री बोलतील,’ असे त्यांनी जाहीर केले. मुख्यमंत्र्यांनी पुण्याच्या वाहतुकीचे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले. आमदार जोशींनी केलेल्या कामाचे कौतुक करत त्यांना शाबासकी दिली. त्या वेळी कार्यकर्त्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला.. हा कार्यक्रम पोलीस आयुक्तालयात होता खरा, पण तिथे पोलीस मागे आणि काँग्रेस कार्यकर्ते पुढे, असेच चित्र होते.