पुणे : फलकावर छायाचित्र लावले नसल्याच्या रागातून कोथरूड येथील शास्त्रीनगर भागात तलवार फिरवत दहशत निर्माण करणाऱ्यासह त्याच्या साथीदाराला गुन्हे शाखेने पवना धरणाजवळील तुंगी डोंगर परिसरातून अटक केली. मागील तीन दिवसांपासून गुन्हे शाखेची पथके आरोपीच्या मागावर होती. ओंकार ऊर्फ बाबा कुडले (रा. सागर कॉलनी, कोथरूड) आणि अशोक बाळकृष्ण काजळकर (३०) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत अक्षय बाबासाहेब गायकवाड (वय २२, रा. शास्त्रीनगर, कोथरूड) याने फिर्याद दिली आहे.  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती निमित्त १ ऑगस्ट रोजी कोथरूडमधील शास्त्रीनगर भागात मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. मिरवणुकीसंदर्भात फलकावर छायाचित्र का लावले नाही, असे विचारून ओंकार कुडले याने हातात तलवार घेवून परिसरात दहशत माजविली. तसेच तलवारीने ध्वनियंत्रणा हाताळणाऱ्या युवकावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो बाजूला सरकल्याने वार चुकला. त्यामध्ये ध्वनियंत्रणेचे नुकसान झाले. या घटनेमुळे परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली होती.

घटनेचे गांभीर्य पाहता स्वतः पोलीस आयुक्त रितेश कुमार, सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत आरोपींना पकडण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार मागील तीन दिवसांपासून पोलिसांची पथके आरोपींच्या मागावर होती. अखेर तुंगी परिसरातून कुडले व त्याच्या सहकाऱ्याला अटक करण्यात पोलिसांना यश आले.  गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली यूनिट चारचे पोलीस निरीक्षक गणेश माने, खंडणी विरोधी पथक एकचे पोलीस निरीक्षक अजय वाघमारे, सहायक निरीक्षक अभिजीत पाटील, अंमलदार मनोज सांगळे, संजय आढारी, वैभव रणपिसे, अशोक शेलार, किरण ठवरे, विजय कांबळे, प्रफुल्ल चव्हाण यांच्यासह पथकाने ही कामगिरी केली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The accused who terrorized by swinging a sword was arrested pune print news vvk 10 ysh
Show comments