कोरेगाव भीमा ऐतिहासिक स्तंभ परिसरातील प्रत्यक्ष कामे लवकरच सुरू करण्यात येणार आहेत. समाज कल्याण आयुक्त प्रशांत नारनवरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. भीमा कोरेगाव विजयस्तंभ शौर्यदिन समन्वय समिती अध्यक्ष राहुल डंबाळे, बार्टीचे महासंचालक डॉ. धम्मज्योती गजभिये, पोलीस उपायुक्त राहुल पवार, परशुराम वाडेकर, माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे आदी उपस्थित होते.
हेही वाचा : पुण्यात येरवडा कारागृहात कैद्यांमध्ये भांडण; पोलीस हवालदारालाही मारहाण
राज्य शासनाने जाहीर केलेल्या सुमारे १०० कोटी रुपयांच्या राष्ट्रीय स्मारकाचे कामकाज तत्काळ सुरू करण्यात येत आहे. बैठकीत प्राप्त झालेल्या सूचनेनुसार तसेच १ डिसेंबर २०२१ रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी समाज कल्याण आयुक्तांना सादर केलेल्या ६७ कोटी रुपयांच्या विकास आराखड्याच्या अनुषंगाने न्यायालयाची स्थगिती नसलेल्या स्मारकालगतच्या जागेवर नियोजित आराखड्यातील कामे तत्काळ सुरू करावी, अशा सूचना नारनवरे यांनी दिल्याचे डंबाळे यांनी सांगितले. या कामाची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी प्रशासकीस आणि समन्वय समिती ११ नोव्हेंबरला स्तंभ परिसराची पाहणी करणार आहेत.