विविध देशांत करोना रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. तसेच लोहगाव विमानतळावर उतरलेल्या एका प्रवाशाला करोनाची लागण झाल्याचे गुरुवारी निदर्शनास आले. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने करोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी तयारी केली आहे. यामध्ये प्राणवायू साठवणूक टाक्या, प्राणवायू प्रकल्प, कृत्रिम श्वसन यंत्रणा, साधे आणि अतिदक्षता खाटा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. तसेच जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जिल्हास्तरीय करोना अभ्यास कृती गटाची (टास्कफोर्स) बैठकही घेतली आहे.
हेही वाचा- पुणे जिल्ह्यातील अंगणवाड्या वीजजोडणी अभावी अंधारात
चीन, जपानसह विविध देशांत करोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. केंद्राने अद्याप करोना वाढलेल्या देशांतून भारतात येणाऱ्या विमानसेवेला बंदी घातलेली नाही. या पार्श्वभूमीवर शहरासह जिल्ह्यातील करोना प्रतिबंधक उपाययोजनांची प्रशासनाने तयारी केली आहे. करोना रुग्णांची संख्या वाढल्यास त्याला यशस्वीपणे तोंड देण्यासाठी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सज्ज करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी यंत्रणेला दिले आहेत.
सद्य:स्थितीत चीन, अमेरिका, ब्राझील, इंडोनेशिया, जपान आदी देशांमध्ये करोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पुणे जिल्ह्यातही खबरदारी म्हणून प्रतिबंधक उपाययोजनांना गती देण्यासाठी आणि यंत्रणांच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेण्यात आली. प्राणवायू प्रकल्प, द्रव प्राणवायू साठवणूक टाकी, रुग्णालयातील प्राणवायू वाहिनी आदी आवश्यक साहित्य सामग्रीच्या प्रात्यक्षिकात त्रुटी आढळल्यास त्या तातडीने दूर कराव्यात. करोनाच्या संभाव्य स्थितीचा नियोजनबद्धरीत्या सामना करण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवावी. जास्तीतजास्त पात्र नागरिकांचे करोना प्रतिबंधक लसीकरण करण्यासाठी लसीकरण केंद्रांची संख्या वाढविण्याची सूचनाही जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी बैठकीत केली.
हेही वाचा- पुणे : पिंपरी पालिकेचे सुधारित वैद्यकीय परवाना धोरण; सुश्रृषागृहांना १ ते ५ खाटांसाठी ४५०० रुपये शुल्क
लसीकरणाचा आढावा
सद्य:स्थितीत जिल्ह्यात करोनाचे ५० रुग्ण असून दैनंदिन सरासरी ११ रुग्ण बरे होत आहेत. करोना प्रतिबंधक लसीकरणाला गती देण्यात येत असून आतापर्यंत जिल्ह्यात एकूण एक कोटी ९३ लाख ४५ हजार ४७० जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. त्यामध्ये ९९ लाख पाच हजार ४१८ पहिली मात्रा, ८४ लाख ५९ हजार ८३४ दुसरी मात्रा, तर नऊ लाख ८० हजार २१८ जणांना वर्धक मात्रा देण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र स्तरावर सर्व लाभार्थीसाठी कोविड लसीकरणाची सोय केली आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांनी दिली.
हेही वाचा- पुणे महापालिकेकडून प्लास्टिक विरोधी कारवाई; १ हजार किलो प्लास्टिक जप्त
यंत्रणा सज्ज
करोना उपाययोजनांतर्गत जिल्ह्यात ११४ प्रेशर स्विंग ॲड्सॉर्प्शन (पीएसए) प्राणवायू प्रकल्प, तर १०९ द्रव प्राणवायू साठवणूक टाक्या उपलब्ध असून या दोन्हींची मिळून एकूण क्षमता १२१० मेट्रिक टन आहे. जिल्ह्यामध्ये सुस्थितीतील ११९६ कृत्रिम श्वसन यंत्रणा, १०९७ प्राणवायू प्राणवायू सांद्रित्र (कॉन्सन्ट्रेटर) उपलब्ध आहेत. जिल्ह्यात एकूण ५४०१ विलगीकरण खाटा, ५९६४ प्राणवायू खाटा, १२९३ अतिदक्षता खाटा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.