पिंपरी : विकास आराखड्यातील रस्त्यासाठी भोसरीतील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातील (एमआयडीसी) ९२ उद्योजकांची जागा प्रशासनाने घेतली आहे. त्यामुळे या उद्योजकांना चऱ्होलीत दहा एकर पर्यायी जागा देण्यात आली आहे. आजपासून त्यांचे स्थलांतर करण्याच्या सूचना महापालिका प्रशासनाला दिल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
सामंत म्हणाले, की विकास आराखड्यामधील रस्त्यामध्ये ९२ उद्योजकांची जागा गेली आहे. हे उद्योजक अनधिकृत होते की अधिकृत होते, यापेक्षा ते पोट भरत होते हे महत्त्वाचे आहे. एखाद्या रस्त्यामुळे काही लोकांच्या पोटावर वरवंटा फिरणार असेल, तर त्यांना जागा देण्याची सरकारची जबाबदारी आहे. हे उद्योजक अनेक बेरोजगारांना रोजगार देत आहेत. त्यामुळे त्यांना वाऱ्यावर सोडता येणार नाही. त्यांच्यासाठी चऱ्होली परिसरात दहा एकर जागा देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.
हेही वाचा >>>पिंपरी-चिंचवडकरांवर पाणी कपातीचे संकट; महापालिका प्रशासन मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
या उद्योजकांना उद्यापासूनही व्यवसाय स्थलांतर करता येऊ शकते. त्यांना किती जागा द्यायची हे असोसिएशन ठरविणार आहे. त्यानुसार जागा ताब्यात देण्याचा ठराव चार दिवसांत होईल. मात्र, या ठरावासाठी व्यावसायिकांना थांबण्याची आवश्यकता नाही. स्थलांतर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. एमआयडीसी भागासाठी स्वतंत्र पोलीस ठाण्याची उद्योजकांची वारंवार मागणी होते. त्यानुसार एमआयडीसीसाठी स्वतंत्र पोलीस ठाणे बांधून देणार असल्याचेही सामंत यांनी सांगितले.
हेही वाचा >>>कुमार गंधर्व जन्मशताब्दीनिमित्त ‘लोकसत्ता’चा खास विशेषांक, प्रकाशनानिमित्त पुण्यात खास कार्यक्रमाचे आयोजन
महाविकास आघाडीची वज्रमूठ सैल
पंतप्रधान नरेंद्र मोदी अकार्यक्षम आहेत, काम करत नाहीत, त्यांनी मणिपूरला जावे, असे उद्धव ठाकरे म्हणतात. त्याच वेळी अजित पवार सांगतात, की पंडित जवाहरलाल नेहरु, इंदिरा गांधीनंतर कर्तव्यदक्ष, कर्तबगार पंतप्रधान कोण असतील तर ते नरेंद्र मोदी आहेत. महाविकास आघाडीतील या नेत्यांच्या विधानामुळे वज्रमूठ किती मजबूत आहे हे दिसते, अशी टीका सामंत यांनी केली.