सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडविण्याच्या दृष्टीने विकसित करण्यात आलेला विठ्ठलवाडी ते पु. ल. देशपांडे उद्यानापर्यंतच्या रस्त्याचा वाहतूक पोलिसांच्या आडमुठ्या भूमिकेमुळे वाहनचालकांकडून पर्यायी रस्त्याचा अपेक्षित वापर होत नसल्याची वस्तुस्थिती पुढे आली आहे. पर्यायी मार्गाचा वापर करून सिंहगड रस्त्यावर येताना रस्त्यामधील दुभाजक काढून टाकावेत, अशी मागणी महापालिकेकडून वाहतूक पोलिसांना करण्यात आली आहे. मात्र जोपर्यंत फनटाइम चित्रपटगृह ते राजाराम पूल या दरम्यानच्या उड्डाणपुलाचे काम होत नाही, तोपर्यंत दुभाजक काढणार नाही, अशी भूमिका वाहतूक पोलिसांनी घेतली आहे. त्यामुळे वाहनचालकांना काही मीटर अंतराचा ‘वळसा’ मारावा लागत असल्याने या रस्त्याचा अपेक्षित वापर होत नाही. त्यामुळे सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडीही कायम राहिली आहे.

हेही वाचा >>>पुणे : ई-रजिस्ट्रेशन प्रणालीद्वारे पुण्यातून ८०० दस्तांची नोंदणी

सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी विठ्ठलवाडी ते पु. ल. देशपांडे उद्यानापर्यंत पर्यायी मार्ग सुरू करण्यात आला आहे. महापालिकेच्या पथ विभागाकडून सर्व कामे पूर्ण करण्यात आली असून रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. या रस्त्यामुळे सिंहगड रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी होईल, असा दावा केला जात होता. मात्र रस्ता वाहतुकीला खुला करूनही सिंहगड रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी कायम असल्याची वस्तुस्थिती असून त्याला वाहतूक पोलिसांची आडमुठी भूमिका जबाबदार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा >>>पुणे : रेल्वेच्या आरक्षित कक्षात चोरी ; मध्य रेल्वेला पाच लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश

विठ्ठलवाडी ते पु. ल. देशपांडे उद्यानापर्यंतचा रस्ता अनेक वर्षे या ना त्या कारणांनी रखडला होता. सिंहगड रस्त्याला पर्यायी रस्ता नसताना राजाराम पूल ते फनटाइम चित्रपटगृह या दरम्यान उड्डाणपुलाचे काम महापालिकेकडून सुरू करण्यात आले आहे. पर्यायी पाच रस्ते कागदावर राहिले असतानाच उड्डाणपुलाचे काम सुरू करण्यात आल्याने वाहतूक कोंडीची समस्या तीव्र झाली आहे. एक ते दीड किलोमीटर अंतरासाठी वाहनचालकांना ४५ मिनिटांचा प्रवास करावा लागत आहे. त्यातच रखडलेला पर्यायी मार्गाचा वापर अपेक्षित होत नसल्याने सिंहगड रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कायम राहिला आहे.विठ्ठलवाडीहून पु. ल. देशपांडे उद्यानापर्यंत आल्यानंतर स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनचालकांना काही मीटर अंतराचा वळसा घालावा लागत आहे. त्यामुळे वाहनचालकांच्या सोईसाठी पु. ल. देशपांडे उद्यानासमोरील दुभाजक काढून टाकावा आणि तेथे वाहतूक नियंत्रक दिवे लावण्याची मागणी पथ विभागाने वाहतूक पोलिसांना केली होती. मात्र वाहतूक पोलिसांनी ती अमान्य केली असून उड्डाणपुलाचे काम होत नाही तोपर्यंत दुभाजक काढता येणार नाही, असे महापालिकेला कळविले आहे. त्यामुळेच वाहनचालकांकडून रस्त्याचा वापर होत नसल्याचा दावा महापालिकेच्या पथ विभागाकडून करण्यात आला आहे.

हेही वाचा >>>पुणे : विद्यापीठाने शुल्कवाढ मागे घेण्यासाठी डॉ. बाबा आढाव यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांचे उपोषण

सिंहगड रस्त्याला पर्यायी रस्ता नाही. त्यामुळे या रस्त्यावर वाहतुकीची सातत्याने कोंडी होत असल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे. डोणजे, खडकवासला, किरकिटवाडी, नांदेडसिटी, धायरी, वडगांव, सनसिटी, माणिकबाग येथे जाण्यासाठी सिंहगड रस्ता एकमेव रस्ता आहे. सध्या विठ्ठलवाडीपासून फनटाइम चित्रपटगृहापर्यंतच्या कालवा रस्त्याचा वापर वाहनचालकांकडून मोठ्या प्रमाणावर होत आहे.

पर्यायी रस्त्यांसाठीच्या तरतुदी
सिंहगड रस्ता उड्डाणपूल- ४० कोटी
लगड वस्ती ते सावित्री गार्डन- ५५ लाख
राजयोग सोसायटी ते लगड वस्ती- ५० लाख
इंडियन ह्यूम पाइप ते सर्वेक्षण क्रमांक ३२- १ कोटी
धायरी फाटा ते उंबऱ्या गणपती रस्ता – ५५ लाख

हेही वाचा >>> पुणे : एकविसाव्या शतकातील शिक्षकांमध्ये कौशल्यांचा अभाव

विठ्ठलवाडी ते पु. ल. देशपांडे उद्यान या पर्यायी रस्त्याचे काम पूर्ण झाले असून वाहतुकीसाठी तो खुला करण्यात आला आहे. मात्र वळसा घ्यावा लागत असल्याने त्याचा वापर कमी होत आहे. त्याबाबत वाहतूक पोलिसांना कळविण्यात आले आहे.- व्ही. जी. कुलकर्णी, मुख्य अभियंता, पथ विभाग, महापालिका

Story img Loader