पुणे: वडिलांच्या अपघाती मृत्यूनंतर नुकसान भरपाई दाव्यासाठी कागदपत्रांची मागणी करणाऱ्या भिगवण पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षकासह वकिलाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पकडले. भिगवण पोलीस ठाण्यात ही कारवाई करण्यात आली.
याप्रकरणी भिगवण पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक प्रवीण सुग्रीव लोकरे (वय ५२), ॲड. मधुकर विठ्ठल काेरडे (वय ३४, रा. मिरजगाव, ता. कर्जत, जि. अहमदनगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका तरुणाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली आहे. तक्रारदार तरुणाच्या वडिलांचा जून महिन्यात अपघाती मृत्यू झाला होता. अपघाती मृत्यू प्रकरणी दावा दाखल करण्यासाठी अपघात करणाऱ्या वाहनाची विमा कागदपत्रांची आवश्यकता असल्याने तरुणाने भिगवण पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक लोकरे यांची भेट घेतली.
हेही वाचा… पुणे: पोलीस भरतीच्या आमिषाने तरुणीवर बलात्कार
कागदपत्रे देण्यासाठी लोकरे यांनी तक्रारादाराकडे ३० हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडीत २० हजार रुपये देण्याचे मान्य करुन तरुणाने ॲड. कोरडे यांना २० हजार रुपये दिले. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावून लोकरे, ॲड. कोरडे यांना पकडले. पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अतिरिक्त अधीक्षक डाॅ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक नितीन जाधव, पोलीस निरीक्षक वीरनाथ माने यांनी ही कारवाई केली.