पुणे : शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) राज्यातील खासगी शाळांतील २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेतील अर्जांसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार आता पालकांना २ फेब्रुवारीपर्यंत अर्ज भरता येणार असून, या पुढे मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. सोमवार सायंकाळपर्यंत २ लाख ५२ हजारांहून अधिक अर्ज दाखल झाले आहेत.

प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. प्राथमिक शिक्षण संचालनालयातर्फे आरटीई प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या अंतर्गत आर्थिक दुर्बल आणि वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना खासगी शाळांमध्ये मोफत प्रवेश घेता येतो. आरटीईअंतर्गत प्रवेशित विद्यार्थ्यांच्या शुल्काची प्रतिपूर्ती राज्य सरकारकडून शाळांना करण्यात येते. यंदा राज्यभरातील ८ हजार ८६३ शाळांमध्ये प्रवेशासाठी १ लाख ९ हजार १११ जागा उपलब्ध झाल्या आहेत. या प्रक्रियेत अर्ज भरण्यासाठी १४ ते २७ जानेवारीची मुदत देण्यात आली होती. मात्र अद्यापही अर्ज न भरलेल्या पालकांना संधी मिळण्यासाठी २ फेब्रुवारीपर्यंत मुदत वाढवण्यात आली आहे.

आरटीई संकेतस्थळावरील आकडेवारीनुसार सोमवारी सायंकाळपर्यंत २ लाख ५२ हजार ८९१ विद्यार्थ्यांचे अर्ज दाखल झाले. त्यात सर्वाधिक ५२ हजार ८०५ अर्ज पुणे जिल्ह्यातील आहेत. त्या खालोखाल नागपूर जिल्ह्यातून २५ हजार ८०४, ठाणे जिल्ह्यातून २१ हजार ९१६, नाशिक जिल्ह्यातून १४ हजार ६३७, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून १३ हजार ४९३ अर्ज दाखल झाल्याचे दिसून येत आहे.

Story img Loader