विस्तारणाऱ्या पुणे शहराच्या सुरक्षेचा पुणे पोलिसांवरील भार दिवसेंदिवस वाढत आहे. नेहमी घडणाऱ्या गुन्ह्यांबरोबरच शहरात गेल्या काही वर्षांत बॉम्बस्फोटाच्या घटनाही घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पुणे शहर पोलिसांच्या बॉम्ब नाशक आणि शोधक पथकात लवकरच एक आधुनिक पोलीस दाखल होणार आहे. ‘दक्ष’ असे या पोलिसाचे नाव असून तो रोबोट आहे. त्यामुळे पुणे पोलिस दल अधिक अत्याधुनिक होणार आहे.


यासंदर्भात पुण्याचे पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी नुकतेच या रोबटची माहिती देणारे व्टिट केले. पुणे पोलिसांच्या बॉम्ब नाशक व शोधक पथकासाठी डीआरडीओकडून हा रोबोट घेण्यात येणार आहे. पुर्णत: स्वयंचलित आणि रिमोटवर चालणारा हा रोबोट असून तो बॉम्ब शोधून नष्टही करु शकतो, त्यामुळे याचा मोठा फायदा पुणे पोलीसांना आपल्या शोधकार्यासाठी होणार आहे.

बॉम्ब शोधण्यासाठी पारंपारिक पद्धतीने पोलीस श्वानांचा वापर करतात. त्यांच्या अत्यंत संवेदनशील घ्राणेंद्रियांचा वापर यासाठी केला जातो. मात्र, त्यालाही मर्यादा असल्याने आता बॉम्ब शोधण्यासाठी आणि नष्ट करण्यासाठी रोबोटचीही मदत पुणे पोलीस घेणार आहेत.

पुणे शहरात गेल्या काही वर्षांत घडलेल्या जर्मन बेकरी बॉम्बस्फोट, जे. एम. रस्ता बॉम्बस्फोट प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस ‘दक्ष’ रोबोटच्या येण्याने आणखी सक्षम होणार आहे. यामुळे बॉम्ब शोधक व नाशक पथकाचेही अत्याधुनिकरण झाले आहे.