पुणे : जागतिक पातळीवरील अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि प्रदूषणमुक्त इंधन प्रणाली देशातील वाहन निर्मिती उद्योगाने आत्मसात करायला हवी. हे घडल्यास हा उद्योग देशातील पहिल्या क्रमांकाचा उद्योग बनेल, असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी गुरूवारी व्यक्त केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘कमर्शियल व्हेईकल फोरम’तर्फे आयोजित परिषदेत गडकरी बोलत होते. देशभरातील प्रमुख वाहन निर्मिती कंपन्यांचे प्रतिनिधी या परिषदेला उपस्थित होते. या वेळी बोलताना गडकरी म्हणाले की, केंद्र सरकारला वस्तू आणि सेवा कराच्या माध्यमातून सर्वाधिक महसूल देणारा आणि सर्वाधिक रोजगार निर्माण करणारा वाहन निर्मिती उद्योग आहे. देशात तयार होणाऱ्या मोठ्या व्यावसायिक वाहनांपैकी ५० टक्के वाहनांची निर्यात होते. वाहन निर्मिती क्षेत्रात भारत चौथ्या स्थानावर पोचला असून आत्मनिर्भर भारताच्या उभारणीत या उद्योगाचा वाटा फार मोलाचा ठरला आहे.

जुनी वाहने भंगारात काढण्याचा धोरणाचा सकारात्मक परिणाम या उद्योगावर झाल्याचे सांगून ते पुढे म्हणाले की, आज देशात नोंदणीकृत सुमारे ३५ कोटी वाहने आहेत. दररोज त्यात भर पडत असून, इंधन आयातीवरील खर्चही वाढत आहे. पर्यायाने प्रदूषणाचे प्रमाणही वाढत आहे. ते रोखण्यासाठी या उद्योगाने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करतानाच इथेनॉल, मिथेनोल, जैव इंधन, हायड्रोजन आणि विजेसारख्या प्रदूषणमुक्त इंधन प्रणालीचा उपयोग होईल अशी वाहने तयार केली पाहिजेत. त्यादृष्टीने भारतात खूप चांगले संशोधन देखील सुरू आहे. देशातील सार्वजनिक वाहतूक सेवा लवकरच विजेवर चालणाऱ्या वाहनांच्या माध्यमातून देण्याच्या दृष्टीने धोरण आखले जाणार आहे.

कृषी मालाच्या कचऱ्यापासून जैविक इंधन बनवण्याचे उद्योग देशात उभे राहत आहेत. फ्लेक्स इंजिन निर्मितीच्या क्षेत्रातही भारताने चांगली प्रगती केली आहे. मात्र, त्याला अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळाली तर वाहन उद्योग लवकरच देशातील पहिल्या क्रमांकाचा उद्योग बनेल. – नितीन गडकरी, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The auto industry will reach first place nitin gadkari pune print news stj 05 ysh