पुणे : फिरत्या हौदांमध्ये गणेश मूर्ती विसर्जन होत नसतानाही फिरत्या हौदाची सुविधा देण्याचा घाट महापालिकेने घातल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या वर्षी फिरत्या हौदांमध्ये १३ टक्के गणेश मूर्तींचे विसर्जन झाले होते. यंदा त्याहीपेक्षा कमी केवळ १०.५ टक्के मूर्तींचे विसर्जन झाले. त्यामुळे १५० फिरत्या हौदांसाठी महापालिकेने केलेला दीड कोटी रुपयांचा खर्च पाण्यात गेला आहे.
गणेशमूर्ती विसर्जनासाठी गेली दोन वर्षे एकाच जागी उभ्या असणाऱ्या फिरत्या हौदांची सुविधा यंदा उपलब्ध न करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने गणेशोत्सवापूर्वी जाहीर केला होता. मात्र अचानक १५० फिरत्या हौदांची सुविधा देण्याचे निश्चित करून त्या संदर्भातील निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. फिरत्या हौदांमध्ये मूर्ती विसर्जन होत नसल्याचे गेल्या तीन वर्षांमध्ये दिसून आल्यानंतरही हा घाट घालण्यात आला होता. यंदाही फिरत्या हौदात अपेक्षित मूर्ती विसर्जन न झाल्याने या सुविधेवरील प्रश्नचिन्ह कायम राहिले असून, हा खर्च नेमका कोणासाठी, असा प्रश्न उपस्थित होण्यास सुरुवात झाली असून, सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी आकडेवारीसह ही बाब आयुक्त, प्रशासक विक्रम कुमार यांच्या निदर्शनास आणून दिली आहे.
हेही वाचा >>> पुणेरी मेट्रोला महामेट्रोशी जोडणार!, दीडशे मीटरचा पादचारी पूल उभारणार
सन २०१९ पर्यंत अनेक वर्षे महापालिकेने गणेश विसर्जनासाठी शहरात विविध ठिकाणी, तसेच घाटांवर ४६ बांधलेले हौद, ३५९ लोखंडी टाक्या, १९१ मूर्ती संकलन- दान केंद्रे अशी व्यवस्था केली होती. ही यंत्रणा पुरेशी ठरत होती. यंदा करोना निर्बंध नसल्याने २०१९ प्रमाणे गणेश विसर्जनासाठी शहरात विविध ठिकाणी तसेच घाटांवर ४६ बांधलेले हौद, ३५९ लोखंडी टाक्या, १९१ मूर्ती संकलन- दान केंद्रे अशी व्यवस्था उपलब्ध होती. मात्र पाचव्या, सहाव्या, सातव्या आणि अकराव्या दिवशी फिरत्या हौदांची सुविधा असेल, असे महापालिकेने जाहीर केले होते.
विसर्जनाच्या सहाव्या दिवशी १६७ मूर्तींचे फिरत्या हौदांत विसर्जन झाले. आठव्या दिवशी शून्य, नवव्या दिवशी ८६०, तर अकराव्या दिवशी एकाही गणपतीचे विसर्जन या हौदांत झाले नाही. यंदा पाचवा दिवस व गौरी-गणपती विसर्जन एकाच दिवशी आल्याने त्या दिवशी तरी जास्त गणपतींचे विसर्जन फिरत्या हौदांत होईल अशी अपेक्षा होती. मात्र त्या दिवशी विसर्जन झालेल्या ९५ हजार ४१ गणपतींपैकी फक्त चार हजार २८७ म्हणजेच साडेचार टक्के गणपतींचे विसर्जन फिरत्या हौदांत झाले. गेल्या वर्षी गौरी विसर्जन सहाव्या दिवशी होते, तेव्हा पाचव्या व सहाव्या दिवशी मिळून आठ हजार ३६३ गणपतींचे विसर्जन फिरत्या हौदात झाले होते.
हेही वाचा >>> पिंपरी-चिंचवडमधील झोपड्यांना ‘गुगल प्लस कोड’
फिरत्या विसर्जन हौदात गेल्या वर्षी १३ टक्के गणपतींचे विसर्जन झाले तर यंदा साडेदहा टक्केच गणपतींचे विसर्जन झाले. यावरून ९० टक्के भाविकांना या फिरत्या विसर्जन हौदांची गरजच भासली नाही. तरीही आयुक्तांच्या अट्टाहासापायी जनतेच्या दीड कोटी रुपयांचे फिरत्या विसर्जन हौदात विसर्जन झाले. त्यामुळे ठेकेदाराला केवळ सातव्या आणि दहाव्या दिवसाची रक्कम द्यावी आणि पुढील वर्षापासून हा वायफळ खर्च बंद करावा, असे वेलणकर यांनी सांगितले.