पुणे : मोबाइलपासून विद्युत वाहनांपर्यंत प्रत्येक ठिकाणी आवश्यक असलेल्या बॅटरीचे जीवनमान आता अफाट वाढणार आहे. डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजीने तब्बल सहा हजार वर्षे टिकू शकणाऱ्या बॅटरीची निर्मिती करण्यात येत असून, या बॅटरीमुळे देशाची अर्थव्यवस्था बदलण्याचा दावा करण्यात येत आहे.
देशातील आघाडीच्या अभियांत्रिकी शिक्षण संस्थांपैकी एक असलेल्या डाएटचे कुलगुरू डॉ. सी. पी. रामनारायणन यांनी डाएटमध्ये सुरू असलेल्या संशोधनाबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली. बॅटरी, संवाद प्रणाली, रडार, क्वांटम तंत्रज्ञान, ऊर्जा अशा क्षेत्रांमध्ये करण्यात येत असलेल्या या संशोधनांचे सादरीकरण सोमवारी (१५ मे) होणाऱ्या पदवीप्रदान कार्यक्रमात संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासमोर करण्यात येणार आहे.
हेही वाचा >>> “सख्खे भाऊ झाले पक्के वैरी…” सारसबाग परिसरात हॉकी स्टीकने मारहाण, ज्यूस सेंटरची तोडफोड
पारंपरिक ऊर्जेला पर्याय म्हणून विद्युत किंवा बॅटरीवर चालणारी उपकरणे, वाहने वापरली जातात. मात्र या बॅटरीचे आयुष्य कमी असते. त्यामुळे बॅटरीचे आयुष्य वाढवण्यासाठीच्या तंत्रज्ञानासाठी भाभा अणू संशोधन केंद्राच्या (बीएआरसी) सहकार्याने संशोधन करण्यात येत आहे. या तंत्रज्ञानात नॅनो डायमंड हा घटक अत्यंत महत्त्वाचा असतो. हा नॅनो डायमंड प्रयोगशाळेत तयार करण्यात आला. त्यामुळे बॅटरीचे आयुष्य अमर्याद वाढू शकेल. सुमारे सहा हजार वर्षे, म्हणजे अनेक पिढ्या एकाच बॅटरीचा वापर करता येऊ शकेल. बॅटरीचा पुनर्वापर करता येत असल्याने ही स्वच्छ ऊर्जा आहे. त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था बदलेल, असे डॉ. रामनारायणन यांनी सांगितले.
हेही वाचा >>> पुणे : रेल्वे तिकिटांच्या काळ्या बाजाराला अखेर बसला चाप
गेल्या काही वर्षांत ड्रोनचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे ड्रोनद्वारे हल्लेही केले जातात. इलेक्ट्रॉनिक पद्धतीने ड्रोन नष्ट करण्यासाठी सॉफ्ट किल हे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. त्यात इलेक्ट्रॉनिक बंदुकीच्या सहाय्याने ड्रोन पाडला जातो. त्याशिवाय हेलिकॉप्टरसह आकाशात उडणारी वस्तू शोधण्यासाठी फोटोनिक रडार विकसित करण्यात आले आहे. तसेच बंद केल्यावर अस्तित्त्व राहणार नाही, असे प्लाझ्मा रडारही विकसित करण्यात येत असल्याची माहिती डॉ. रामनारायणन यांनी दिली. जीपीएस डिनाईड नेव्हिगेशन सिस्टिम अर्थात जीपीएस प्रणाली बंद ठेवूनही अचूकतेने हवे असलेले ठिकाण शोधता येणारी प्रणाली तयार करण्यात आली आहे. अशी प्रणाली असलेला भारत हा दुसराच देश ठरणार आहे, असेही त्यांनी नमूद केले.
पाणबुडीशी अवकाशातून संपर्क
समुद्रातील पाणबुडीशी अवकाशातून संपर्क साधण्यासाठीची प्रणालीही विकसित करण्यात आली आहे. सध्या प्रयोगशाळेत कमी क्षमतेची प्रणाली विकसित करण्यात आली आहे. मात्र या प्रणालीची क्षमता आवश्यकतेनुसार वाढवणे शक्य आहे. सध्या पाणबुडीशी अवकाशातून संपर्क साधण्याची प्रणाली उपलब्ध नाही. त्यामुळे अमेरिका, चीन असे देश त्यासाठीचे संशोधन करत आहेत, असे डॉ. रामनारायणन यांनी सांगितले.