पुणे : रेल्वे तिकिटांचा मोठ्या प्रमाणात काळा बाजार सुरू आहे. त्यामुळे प्रवाशांना दलालांकडून जास्त दराने तिकिटे खरेदी करावी लागत आहेत. अशा दलालांसह बेकायदा तिकीट विक्रेत्यांवर रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) एप्रिल महिन्यात देशव्यापी कारवाई केली. देशभरात या मोहिमेंतर्गत ९५५ जणांवर कारवाई करण्यात आली.
रेल्वे सुरक्षा दलाने एप्रिल महिन्यात देशभरात विशेष मोहीम राबवली. यात रेल्वेच्या ई-तिकिटांच्या काळ्या बाजारात गुंतलेल्या गुन्हेगारांची ओळख पटवण्यात आली. त्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. याचबरोबर गाड्यांवर दगडफेक होणारी ठिकाणे शोधण्यात आली. कुठल्या गाड्यांवर दगडफेक केली जाऊ शकते ते तपासून संभाव्य धोका टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या.
हेही वाचा >>> “सख्खे भाऊ झाले पक्के वैरी…” सारसबाग परिसरात हॉकी स्टीकने मारहाण, ज्यूस सेंटरची तोडफोड
अनधिकृत तिकीट दलाल शोधण्यासाठी आणि त्यांना पकडण्यासाठी आरपीएफने रेल्वे स्थानके, आरक्षण केंद्रांसोबत ऑनलाइन सुविधेची तपासणी केली. अनधिकृत दलालांकडून तिकीट नोंदणी केल्यामुळे काय होऊ शकते, याबद्दलही आरपीएफने जनजागृती केली. तसेच कायदेशीर मार्गाने तिकिटांचे आरक्षण आणि ती खरेदी करण्याचे आवाहन प्रवाशांना करण्यात आले. आरपीएफने बेकायदा तिकीट विक्रीच्या व्यवसायात गुंतलेल्या ९५५ जणांवर कारवाई केली. त्यांच्याकडून जप्त केलेल्या ४२ हून अधिक बेकायदा संगणक प्रणालीही नष्ट करण्यात आल्या.
हेही वाचा >>> मी डॉक्टर बोलत आहे.. असे सांगत पुण्यात महिला करतात अशी फसवणूक
रेल्वे गाड्यांवर दगडफेकीच्या घटनांमध्ये मागील काही काळात वाढ झाली आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेला या दगडफेकीमुळे गंभीर धोका निर्माण झाला होता. यावर उपाययोजना करण्यासाठी आरपीएफने स्थानिक अधिकारी आणि प्रशासनाशी चर्चा केली. संबंधित ग्रामपंचायती आणि त्यांचे प्रतिनिधी, शाळा, लोहमार्गावरील वस्ती आणि महाविद्यालये यांच्यासोबत काम करून दगडफेकीच्या परिणामांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले.
दगडफेक, बेकायदा प्रवेश करणाऱ्यांवरही कारवाई
आरपीएफने रेल्वे गाड्यांवर दगडफेक होणारी ठिकाणे शोधून त्या ठिकाणी अनेक उपाययोजना केल्या. अशा ठिकाणी जवान तैनात करून दगडफेक करणाऱ्यांवर कारवाई केली. याचबरोबर रेल्वे गाड्या आणि रेल्वेच्या मालमत्तांमध्ये बेकायदा प्रवेश करणाऱ्यांवरही कारवाई करण्यात आली. एकूण २ हजार ७७३ जणांवर आरपीएफने ही कारवाई केली.