पुणे: बिबवेवाडीतील वास्तूशास्त्र सल्लागाराचे अपहरण करून त्याचा मृतदेह नीरा नदीत टाकून देण्यात आल्यानंतर पोलिसांनी शोधमोहीम राबवून मृतदेह बाहेर काढला. खून प्रकरणात दोन आरोपींना नुकतीच अटक करण्यात आली होती.
नीलेश वरघडे (वय ४३, रा. सुपर इंदिरानगर, बिबवेवाडी) असे खून झालेल्या वास्तूशास्त्र सल्लागाराचे नाव आहे. याप्रकरणी दीपक जयकुमार नरळे (रा. नऱ्हे) आणि रणजित ज्ञानदेव जगदाळे (वय २९) यांना अटक करण्यात आलेल्यांची नावे आहे. याबाबत रूपाली रुपेश वरघडे (वय ४०) यांनी फिर्याद दिली होती. तपास करून पोलिसांनी आरोपींना अटक केली होती. वरघडे यांचा मृतदेह सारोळा पुलावरून नदीत टाकल्याचे आरोपींनी पोलिसांना सांगितले होते. त्यानंतर पोलिसांकडून नीरा नदीत मृतदेहाचा शोध घेण्यात आला. पोलिसांनी महाबळेश्वर ट्रेकर्स, प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीम, भोईराज आपत्ती संघ, वाइल्ड वेस्ट ॲडव्हेंचर रत्नागिरी, महाराष्ट्र आपत्ती व्यवस्थापन संघ, स्थानिक मच्छीमार आणि शिरवळ येथील मुराद पटेल यांच्या मदतीने अखेर सतराव्या दिवशी वरघडे यांचा मृतदेह सारोळा येथील नदीपात्रातून शोधून काढला. बिबवेवाडी पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक संगीता जाधव, पोलिस निरीक्षक अनिता हिवरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक प्रवीण काळुखे, उपनिरीक्षक संजय आदलिंग, विवेक सिसाळ यांनी ही कारवाई केली.
हव्यासातून मित्राचा खून
नीलेश वरघडे वास्तूशास्त्र सल्लागार होते. आरोपी नीलेश यांच्या ओळखीचे होते. नीलेश यांना कॉफीतून गुंगीचे औषध दिले. बेशुद्ध पडल्यानंतर नीलेश यांचा गळा दाबून खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी नीलेश यांचा मृतदेह पोत्यात भरून नीरा नदीत टाकून देऊन आरोपी पसार झाले. नीलेश यांना सोन्याचे दागिने घालण्याची हौस होती. दागिने चोरण्यासाठी आरोपींनी मित्राचा खून केल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे. आरोपींकडून मोटार, दोन दुचाकी, दागिने आणि मोबाइल असा १९ लाख १६ हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.