पुणे : सरकारने ठरवून दिलेल्या तारखेच्या दोन दिवस अगोदर कारखाना सुरू केल्याप्रकरणी रोहित पवार यांच्या मालकीच्या बारामती ॲग्रो कारखान्याची चौकशी सुरू करण्यात आली आहे. याप्रकरणी कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक सुभाष गुळवे यांच्याविरुद्ध भिगवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यंदाचा उसाचा गाळप हंगाम १५ ऑक्टोबर रोजी सुरू होणार होता. मात्र, बारामती ॲग्रो कारखाना १३ ऑक्टोबरला सुरू केला आहे. सरकारने ठरवून दिलेल्या तारखेच्या अगोदर कारखाना सुरू केल्यामुळे बारामती ॲग्रो कारखान्याच्या प्रशासनाविरोधात फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी भाजप आमदार राम शिंदे यांनी केली होती. याबाबत त्यांनी हिवाळी आणि चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला होता. त्यानुसार सहकार विभागातील अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक सुभाष गुळवे यांच्या विरोधात भिगवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
बारामती ॲग्रो कारखान्याने दोन दिवस अगोदर गाळप हंगाम सुरू केला, अशी तक्रार भाजप आमदार राम शिंदे यांनी केली आहे. त्यानुसार चौकशी सुरू आहे. चौकशीअंती नियमानुसार कारवाई केली जाईल.
– शेखर गायकवाड, साखर आयुक्त
जकीय सूड भावनेतून गुन्हा – सुभाष गुळवे
बारामती ॲग्रो साखर कारखान्यावर केवळ राजकीय सूड भावनेतून गुन्हा दाखल करण्यात आल्याचे बारामती ॲग्रो कारखान्याचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे यांनी सांगितले. आमदार राम शिंदे यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. यामध्ये कारखाना मिळालेल्या परवानगीच्या अगोदर काही दिवस सुरू करण्यात आल्याचे म्हटले आहे. मात्र केवळ नियमांचा आधार घेत राजकीय सूड भावनेतून ही कारवाई करण्यात आली आहे. वास्तविक बारामती ॲग्रो, जय श्रीराम हळगाव व अंबालिका शुगर हे कारखाने शेतकऱ्यांना चांगला भाव देत आहेत. हे सहन न झाल्याने केवळ राजकीय द्वेष मनामध्ये ठेवून आमदार शिंदे यांनी ही कारवाई करण्यासाठी साखर आयुक्तांना भाग पाडल्याची टीका गुळवे यांनी केली आहे.