पुणे : देशात चालू खरीप हंगामात कापूस उत्पादनात घट होण्याचा अंदाज आहे. मागील वर्षी देशात ३३६.६० लाख गाठींचे उत्पादन झाले होते. यंदा ३२५.२२ लाख गाठींचे उत्पादन होण्याचा अंदाज केंद्रीय कापूस उत्पादन आणि वापर समितीने (सीओसीपीसी) व्यक्त केला आहे.सीओसीपीसीने दिलेल्या माहितीनुसार, देशात मागील वर्षी ३३६ लाख गाठींचे उत्पादन झाले होते. (एक गाठ १७० किलो कापूस) यंदा ३२५ लाख गाठींचे उत्पादन होण्याचा अंदाज आहे. उत्तर विभागातील पंजाब, हरियाना आणि राजस्थानमध्ये ४७.६० लाख गाठी, मध्य विभागातील गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेशात १८९.०६ लाख गाठी, दक्षिण विभागात तेलगंणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तमिळनाडूत ८१.३० लाख गाठी आणि ओडिशात ७.०५ आणि देशातील अन्य राज्यांत ०.२१ लाख गाठींचे उत्पादन होण्याचा अंदाज आहे.
यंदाच्या कापूस लागवडीची स्थिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या देशातील प्रमुख कापूस उत्पादक राज्यांमध्ये अद्याप अपेक्षित पाऊस झालेला नाही. त्यामुळे कापूस उत्पादनाचा आताच अंदाज लावता येणार नाही, असे मत कापूस उद्योगातील जाणकरांकडून व्यक्त करण्यात येत आहे. शिवाय कापूस उत्पादन वाढवून सांगून देशांतर्गत बाजारात कापसाचे दर पाडले जातात, असा आरोप शेतकरी संघटनेचे नेते करीत आहे.यंदाच्या खरिपात उत्पादीत झालेल्या कापसाचा निश्चित अंदाज लावणे शक्य होणार आहे. कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि.चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक ललित कुमार गुप्ता म्हणाले, की पारदर्शकता आणि चांगल्या कापसाच्या पुरवठ्यासाठी कापसाच्या प्रत्येक गासडीचा क्यूआर कोडच्या आधारे मागोवा घेतला जाणार आहे. क्यूआर कोडच्या माध्यमातून कोणत्या गावातून कापूस आला, कोणत्या कारखान्यात त्यावर प्रक्रिया झाली आणि विक्रीची तारीख ही माहिती समोर येणार आहे.
हेही वाचा >>>येरवडा कारागृहात कैद्यांमध्ये राडा
देशभरातील पेरण्याची स्थिती अद्याप समोर आली नाही. त्यामुळे कापूस उत्पादनाचा आताच ठोस अंदाज लावता येणार नाही. केंद्र सरकारने कापसाचा हमीभाव वाढवला आहे. पण, कापड उद्योगात मंदीची स्थिती आहे. चांगल्या दराच्या अपेक्षेमुळे मागील वर्षीचा सुमारे ४० टक्के कापूस शेतकरी, जिनिंग मिल चालक आणि व्यापाऱ्यांकडे शिल्लक आहे. त्यामुळे यंदाचे वर्ष कापूस उत्पादक शेतकरी आणि कापड उद्योगासाठी आव्हानात्मक असणार आहे.- अशोक स्वामी, अध्यक्ष, राज्य सहकारी वस्त्रोद्योग महासंघ