गतीमान व तीव्र स्पर्धेच्या काळात बातमीतील सत्यता राखण्याचे मोठे आव्हान पत्रकारांपुढे आहे, असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी थेरगाव येथे बोलताना व्यक्त केले. मराठी पत्रकार परिषदेच्या ४३ व्या द्वैवार्षिक राष्ट्रीय अधिवेशनात ते बोलत होते. यावेळी उत्कृष्ट आरोग्य पत्रकारितेबद्दल लोकसत्ताचे संदीप आचार्य यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. साहित्य संमेलनाच्या धर्तीवर मराठी पत्रकार परिषदेला अधिवेशनासाठी २५ लाख रूपये देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.
हेही वाचा- पुणे: हडपसर रेल्वे स्थानकाकडे जाण्यासाठी पीएमपीचे दोन नवे मार्ग
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, प्रसारमाध्यमांचे स्वरूप बदलत चालले आहे. आता सर्वकाही गतीमान झाले आहे. बातम्यांचे स्तोत्र वाढले आहे. चहुबाजूने माहितीचा मारा होत आहे. त्यामुळे पत्रकारांची जबाबदारी आणखी वाढली आहे. चुकीची माहिती प्रसारित होता कामा नये, याची अधिक दक्षता घ्यावी लागणार आहे. तुझ माझं जमेना आणि तुझ्याविना जमेना, असे पत्रकार आणि लोकप्रतिनिधींचे संबंध आहेत. मात्र आपण एका परिवारातील सदस्यांप्रमाणे आहोत. हातात हात घालून काम केले पाहिजे. वृत्तांकन करताना पत्रकारांना अनेक आवाहनांना सामोरे जावे लागते. बातमी मिळविताना पत्रकारांचे कुटुंबाकडे दुर्लक्ष होते. करोना काळात जीवावर उदार होऊन पत्रकारांनी काम केले. सकारात्मक दृष्टिकोनातून पत्रकार सातत्याने समाजाचे प्रश्न मांडतात. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात राज्याला पुढे नेताना विकास पत्रकारितेचे महत्वाचे योगदान आहे आणि भविष्यातही राहील, असे मुख्यमंत्री म्हणाले.