पिंपरी-चिंचवड शहरात गुन्हेगारी वर्चस्वासाठी शस्त्र बाळगण्याकडे कल वाढल्याचे दिसून येत आहे. बेकायदा शस्त्र बाळगणे ही प्रतिष्ठा समजून गुन्हेगारीकडे वळणाऱ्यांची संख्या वाढत आहे. लोकांमध्ये दहशत निर्माण होण्यासाठी शहरात पिस्तुले, कोयते, तलवारी बाळगणाऱ्यांची संख्या वाढली आहे. चालू वर्षात आतापर्यंत बेकायदा पिस्तुले बाळगल्याप्रकरणी १०७ गुन्हे दाखल असून, १४७ पिस्तुले जप्त केली आहेत. तर १६७ जणांना अटक केली आहे. पोलिसांकडून कारवाई करून ही शस्त्र जप्त केली जात आहेत. मात्र, पिस्तुलांची वाढती तस्करी रोखण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

पुणे शहर व पुणे ग्रामीण दलाची विभागणी करून १५ ऑगस्ट २०१८ रोजी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यन्वित झाले. त्यावेळी आयुक्तालयाच्या हद्दीत १४ पोलीस ठाणी होती. त्यानंतर चिखली पोलीस ठाणे कार्यान्वित झाले. त्यानंतर रावेत, शिरगाव परंदवडी आणि म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाणे मंजूर झाले. सध्या १८ पोलीस ठाणे होती. वाकड, हिंजवडी, पिंपरी आणि भोसरी या पोलीस ठाण्यांचे विभाजन करून नव्याने अनुक्रमे काळेवाडी, बावधन, संत तुकारामनगर आणि दापोडी पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात आली आहे. आयुक्तालयांतर्गत आता २३ पोलीस ठाणे झाले असून हद्द वाढत आहे.

आणखी वाचा-शहरात आता रोज रात्री नाकाबंदी; मद्यपी वाहनचालकांवर कडक कारवाई करण्याचे पोलीस आयुक्तांचे आदेश

पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक, गुंडा विरोधी पथक, गुन्हे शाखा आणि मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने नुकतेच हिंजवडी, वाकड, आळंदी आणि चाकण परिसरात वेगवेगळ्या कारवाया करत आठ पिस्तुले आणि १६ जिवंत काडतुसे जप्त केली. या पाच कारवायांमध्ये नऊ जणांना अटकही करण्यात आली. गुन्हे शाखेच्या विविध पथकांकडून वेळोवेळी कारवाई करून शस्त्र जप्त केली जातात. पोलिसांनी केलेल्या कारवायांमध्ये अटक करण्यात आलेल्या बहुतांश आरोपींची पार्श्वभूमी ही गुन्हेगारीची असल्याचे समोर येते. गंभीर गुन्हे दाखल असलेल्या आरोपींना एक, दोन वर्षांसाठी हद्दीतून तडीपार केले जाते. मात्र, ही कारवाई कागदावरच राहत असून तडीपारांचा शहरात वावर असल्याचे दिसून येते. अनेक कारवायांमध्ये तडीपार गुन्हेगारांकडे बेकायदा पिस्तुले, कोयते अशी हत्यारे आढळून आली आहेत. २०२३ मध्ये पिस्तुले बाळगल्याचे १३१ गुन्हे दाखल असून १८२ पिस्तुले जप्त केल्या आहेत. तर, २५४ जणांना अटक करण्यात आली. २०२४ मध्ये आतापर्यंत १०७ गुन्हे दाखल असून १४७ पिस्तुले जप्त केल्या आहेत. १६७ जणांना अटक केली आहे.

आणखी वाचा-खराब हवामानामुळे पुणेकर बेजार! आरोग्यतज्ज्ञांचा काळजी घेण्याचा सल्ला

शस्त्र बाळगल्याने समाजात प्रतिष्ठा होते, असा समज केला जातो. शस्त्राच्या परवान्यासाठी खटाटोप केला जातो. शस्त्र बाळगण्याचा परवाना नसलेल्या व्यक्तीला शस्त्र विक्री करणे किंवा त्याच्याकडून शस्त्र खरेदी करणे हा देखील गुन्हा आहे. बेकायदा शस्त्र बाळगणे हा गंभीर गुन्हा आहे. परवाना असला तरी शस्त्राचा वापर केवळ स्वसंरक्षणासाठी करायचा असतो. शस्त्र दाखवून धमकावणे, भीती, दहशत निर्माण करणे हे कायद्याचे उल्लंघन करणारे ठरते. विनापरवाना शस्त्र बाळगणारे यांच्यावर आर्म ॲक्टनुसार गुन्हा दाखल केला जातो. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशातून गावठी बनावटीचे पिस्तूल शहरात विक्रीसाठी आणले जात असल्याचे वेळोवेळी उघड झाले आहे. पोलिसांनी या टोळीच्या मुळाशी जाऊन कारवाई करण्याची गरज आहे. आता विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात होईल. त्यामुळे पिस्तुलांची वाढती तस्करी रोखण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.

ganesh.yadav@expressindia.com