लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे: सहकानगर भागातील एका इमारतीच्या तळमजल्यावर यांत्रिक पार्किंगसाठी खोदलेल्या खड्ड्यात सफाई कामगार पडल्याची घटना घडली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन खड्ड्यात पडलेल्या जखमी कामगाराला बाहेर काढल्याने तो बचावला.
सहकारनगर भागातील ज्ञानदीप सोसायटीत यांत्रिक पार्किंगसाठी (हायड्रोलिक पार्किंग) १५ फूट खड्डा खोदण्यात आला आहे. इमारतीच्या तळमजल्यावर तुकाराम देठे (वय ६०, रा. चव्हाणनगर, धनकवडी) सफाई करत होते. त्यावेळी देठे यांचा तोल गेला आणि ते खड्ड्यात पडले. खड्ड्यात पडलेले देठे जखमी झाले. त्यांच्या ओरडण्याचा आवाज रहिवाशांनी ऐकला आणि त्वरित या घटनेची माहिती अग्निशमन दलाला कळविली.
हेही वाचा… रजा मंजूर नसतानाही पिंपरी महापालिकेच्या ‘या’ महिला उपायुक्त गेल्या परदेश दौऱ्यावर
अग्निशमन दलाच्या जवानांन घटनास्थळी धाव घेतली. जवान सागर देवकुळे, संदीप घडशी, महेंद्र सपकाळ, शैलेश गोरे,आशिष जाधव, विजय वाघमारे यांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. जवानांनी खड्ड्यात दोर सोडला. दोराला खुर्ची बांधली होती. जखमी अवस्थेतील देठे यांना खुर्चीवर बसवून जवानांनी दोर खेचला. देठे यांना तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली.