पुणे : ‘वैद्यकीय क्षेत्रातील संशोधनामुळे माणसाचे आयुर्मान वाढत आहे. या वाढत्या आयुर्मानाबरोबरच विविध आजारांची आव्हाने पेलण्यासाठी आवश्यक असलेल्या परिहार सेवेची (पॅलेटिव्ह केअर) संकल्पना भारतात रुजणे गरजेचे आहे,’ असे मत महाराष्ट्र आरोग्यविज्ञान विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. अरुण जामकर यांनी शनिवारी व्यक्त केले.
राजहंस प्रकाशनच्या वतीने डॉ. प्रियदर्शिनी कुलकर्णी लिखित ‘सोबत सांजवेळची’ या पुस्तकाचे प्रकाशन प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी डॉ. जामकर बोलत होते. राजहंस प्रकाशनचे संपादक शिरीष सहस्रबुद्धे या वेळी उपस्थित होते.
डॉ. जामकर म्हणाले, ‘दुर्धर आजाराला सामोरे जाताना हतबल रुग्ण आणि त्याच्या नातवाइकांना परिहार सेवा देणाऱ्यांचा मोठा आधार होतो. एकत्र कुटुंब व्यवस्था आणि फॅमिली डॉक्टर हे कधी काळी आपल्या समाजाचे बलस्थान होते. मात्र, काळाच्या ओघात या दोन्ही संकल्पना नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. रुग्ण आणि डॉक्टर यांच्यात स्पर्शासह विविध माध्यमांतून होणारा संवाद हरवत चालल्याने, तसेच त्यांच्यातील विश्वासाचा धागा कमकुवत होत चालल्याने अनेक समस्या निर्माण होत आहेत. सहानुभूती, सहवेदना आणि करुणा या त्रिसूत्रीच्या आधारे परिहार सेवा देता येते. पाश्चात्त्य देशांमध्ये ही संज्ञा चांगल्या प्रकारे रुजली आहे. तेथे नागरिकांकडून १४ टक्के कर आकारून सरकार रुग्णांची शेवटच्या क्षणापर्यंत काळजी घेते.
’मृणाल कुलकर्णी म्हणाल्या, ‘जवळच्या व्यक्तीचा आयुष्याच्या संध्याकाळी होणारा वेदनादायी मृत्यू आपल्याला हालवून टाकतो. वैद्यकीय क्षेत्रातील ‘स्पेशलायझेशन’मुळे एकाही डॉक्टरकडून रुग्णाच्या प्रकृतीविषयी योग्य माहिती मिळत नाही. अशा वेळी मनाने कितीही खंबीर असलो, तरी आता नक्की काय करायचे, अशी आपली अवस्था होऊन जाते. मृत्यू अटळ असला, तरी त्या मृत्यूला सामोरे जाण्याची प्रगल्भता परिहार तज्ज्ञ आपल्यामध्ये निर्माण करतात.’
प्रयदर्शिनी कुलकर्णी यांनी मनोगतामध्ये लेखनप्रवास उलगडला. विनया देसाई यांनी सूत्रसंचालन केले.