पिंपरी-चिंचवडसह मावळला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणाने तळ गाठला आहे. धरणात केवळ १९ टक्केच पाणी साठा शिल्लक असून तो ३१ जुलै पर्यंत पुरेल एवढा आहे. पावसाने हजेरी न लावल्यास पिंपरी-चिंचवडकरांवर जल संकटाची टांगती तलवार आहे. शहरातील नागरिकांनी पाणी जपून वापरावे असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी केले आहे. पाऊस न झाल्यास पाणी कपतीबाबत निर्णय घ्यावा लागेल, असे देखील ते म्हणाले आहेत.
गेल्या वर्षी याच तारखेला धरणात ३४ टक्के पाणीसाठा –
पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणाने तळ गाठला आहे. आधीच शहरातील नागरिकांना दिवसाआड पाणीपुरवठा होतो आहे. त्यात पाऊस न झाल्यास आणखी पाणी कपातीला सामोरे जावं लागण्याची शक्यता आहे. पवना धरणाने तळ गाठला असून धरणात केवळ १९ टक्केच पाणी साठा शिल्लक आहे. जो गेल्यावर्षीच्या तुलनेत फारच कमी आहे. गेल्या वर्षी याच तारखेला धरणात ३४ टक्के पाणी साठा उपलब्ध होता. सुरुवातीला झालेल्या पावसामुळे ३४ टक्क्यांवर पाणी साठा गेला होता, अशी माहिती पवना पाटबंधारे उपअभियंता अशोक शेटे यांनी माहिती दिली आहे.
पाऊस वेळेत न झाल्यास पाणी कपातीचे निर्णय –
गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पाऊस काहीच झाला नाही. गेल्या वर्षी धरण क्षेत्रात अडीच सेंटीमीटर पाऊस झाला होता, अशी माहिती देखील शेटे यांनी दिली. पाऊस वेळेत न झाल्यास पाणी कपातीचे निर्णय महानगर पालिकेला घ्यावे लागतील, असही ते म्हणाले आहेत. नागरिकांनी पाणी जपून वापरण्याच आवाहन त्यांनी लोकसत्ता ऑनलाइनच्या माध्यमातून नागरिकांना केलं आहे.