पिंपरी : राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे मावळचे उमेदवार आमदार सुनील शेळके यांचा उमेदवारी अर्ज भरण्यास उपस्थित राहिल्याने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माऊली दाभाडे यांचे पक्षाकडून निलंबन करण्यात आले आहे. पक्षाची शिस्त मोडल्याने त्यांच्यावर सहा वर्ष निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची माहिती तालुकाध्यक्ष यशवंत मोहोळ यांनी दिली.

आमदार सुनील शेळके आणि माऊली दाभाडे नातलग आहेत. दाभाडे पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. २०१४ मध्ये त्यांनी राष्ट्रवादीकडून मावळमधून विधानसभेची निवडणूकही लढविली होती. सध्या ते काँग्रेसमध्ये असून पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आहेत. मावळमध्ये महाविकास आघाडीचे अद्याप ठरले नाही. उमेदवार जाहीर केला नसून, अपक्ष उमेदवार बापू भेगडे यांना पाठिंंबा असल्याचे स्पष्ट केले नाही. त्यातच आमदार शेळके यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना दाभाडे उपस्थित होते.

हे ही वाचा… कल्याणीनगर अपघात प्रकरण : खटल्याच्या सुनावणीला लवकरच सुरुवात होण्याची शक्यता

काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीचा घटक पक्ष आहे. आमदार शेळके महायुतीचे उमेदवार आहेत. असे असतानाही दाभाडे यांनी त्यांच्या मंचावर जात पाठिंबा दिला. पक्षाची शिस्त मोडली. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, जिल्हाध्यक्ष, आमदार संजय जगताप यांच्या आदेशानुसार दाभाडे यांचे सहा वर्षांसाठी निलंबन करण्यात आल्याचे मोहोळ यांनी सांगितले.

हे ही वाचा… हर्षवर्धन पाटील हे दलबदलू, उपमुख्यमंत्री अजित पवार यांंची टीका

दरम्यान, मावळ विधानसभा मतदारसंघात महायुती बंडखोरी झाली आहे. राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे आमदार सुनील शेळके यांच्या विरोधात भाजपने भूमिका घेतली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचेच बापू भेगडे यांनी बंडखोरी केली आहे. त्यांना भाजपने पाठींबा दिला आहे. त्यामुळे मावळच्या लढतीकडे पुणे जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागले आहे.