जलदगती वाहतुकीसाठी बस रॅपिड ट्रान्झिटचे (बीआरटी) शंभर किलोमीटर लांबीचे जाळे विकसित करण्याची घोषणा करणाऱ्या महापालिकेला पाच वर्षांत एक किलोमीटर लांबीचाही मार्ग विकसित करता आलेला नाही. अस्तित्वातील मार्गांच्या सक्षमीकरणाच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी करणाऱ्या महापालिकेच्या निष्क्रियेतमुळेच बीआरटी मार्ग मृत्युशय्येवर असल्याची वस्तुस्थिती आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराला जोडणारा बीआरटी मार्गही कागदावरच राहिला आहे. मात्र त्यासाठी ७४ कोटींच्या खर्चाला मात्र मंजुरी देण्यात आली आहे.
हेही वाचा >>>पुणे महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयासाठी बांधली जाणार स्वतंत्र इमारत; १०९ कोटींच्या निविदेला तांत्रिक मान्यता
सार्वजनिक वाहतुकीचे सक्षमीकरण करण्यासाठी पंधरा वर्षांपूर्वी मोठा गाजावाजा करत बीआरटी मार्ग सुरू करण्यात आला. बीआरटी सेवा सुरू करणारी पुणे ही देशातील पहिली महापालिका ठरली होती. त्यानंतर देशातील अनेक प्रमुख शहरात बीआरटी सेवेचा झपाट्याने विस्तार होत असताना आणि देशभरात एक हजार किलोमीटरहून अधिक लांबीचे जाळे निर्माण झाले असताना शहरातील बीआरटीचा मात्र बट्ट्याबोळ झाला आहे. महापालिकेच्या दरवर्षीच्या अंदाजपत्रकात बीआरटी मार्गाचे सक्षमीकरण करण्यासाठी नव्याने बीआरटी मार्ग प्रस्तावित करण्यासाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद केली जाते. मात्र गेल्या पाच वर्षात एकही किलोमीटरने बीआरटी सेवेचा विस्तार झाला नसल्याची वस्तुस्थिती आहे.स्वारगेट ते कात्रज दरम्यानच्या साडेपाच किलोमीटर लांबीच्या आणि नगर रस्त्यावरील सोळा किलोमीटर लांबीच्या बीआरटी मार्गांचे काम पूर्ण झाल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र जेमतेम पाच ते सात किलोमीटर अंतरात बीआरटी मार्ग रडतखडत सुरू आहे. पाटील इस्टेट जंक्शन ते हॅरिस ब्रिज, बोपोडी, सिमला ऑफिस चौक ते राजीव गांधी पूल, औंध, रेंजहिल चौक ते खडकी रेल्वे स्टेशन, गणेशखिंड रस्ता, पुणे-मुंबई रस्ता आणि पाटील इस्टेट ते संगमवाडी या मार्गांवर बीआरटी विकसित झालेली नाही.
हेही वाचा >>>पुणे: बांधकाम व्यवसायिकांच्या मनमानी कारभाराला बसणार चाप; महारेराच्या वसुली वॉरंटच्या अंमलबजावणीसाठी समन्वयक अधिकारी
स्वारगेट ते हडपसर या मार्गावर बीआरटी सुरू झाल्यानंतर येरवडा ते वाघोली, संगमवाडी ते विश्रांतवाडी या मार्गांवरही ती सुरू करण्यात आली. महापालिकेने काही वर्षांपूर्वी पुणे-सातारा महामार्गावरील बीआरटीच्या फेररचनेचे काम पूर्ण केले. मात्र, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या औंध-रावेत आणि दापोडी ते निगडी या दोन बीआरटी मार्गांना पुणे महापालिका भवनपर्यंत जोडण्यासाठी बीआरटी मार्गांचा विकास करण्याचे महापालिकेचे नियोजन होते. त्यासाठी निविदा राबविण्यात येऊन ठेकेदार निश्चित केला गेला होता. त्या वेळी वाहतूक पोलिसांनी ना-हरकत नाकारल्याने महापालिकेने या मार्गांवरील बीआरटी विकसित करण्याची प्रक्रिया मागे पडली. या दरम्यान, मेट्रोची कामे सुरू झाल्याने सध्या काम शक्य नाही, अशी भूमिका महापालिकेने घेतल्याने एक किलोमीटरनेही वाढ झालेली नाही. तर संगमवाडी बीआरटी मार्गाची महापालिकेनेच वाट लावली आहे.
विद्यापीठ रस्त्यावर सुरू असलेल्या मेट्रोच्या कामामुळे औंध ते मनपा भवन हा बीआरटी मार्ग विकसित करणे तूर्तास अशक्य आहे. मात्र जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील हॅरिस ब्रिज ते महापालिका भवन या दरम्यानच्या मार्गासाठी ७४ कोटी ७५ लाखांच्या खर्चाला मान्यता देण्यात आली आहे. मात्र या मार्गाचेही काम अद्याप सुरू झालेले नाही.