पुणे : जिल्ह्यातील मावळ कृषी उत्पन्न बाजार समितीचा निकाल काही तासांत हाती येणार आहे. आज सकाळी नऊच्या सुमारास वडगाव मावळ पंचायत समिती येथे मतमोजणीला सुरुवात झाली. परंतु, संबंधित अधिकारी नाष्टा करत असल्याने मतमोजणीला ब्रेक लागला आहे.
मतमोजणी सुरू करण्याअगोदर अधिकाऱ्यांनी नाष्टा करणं क्रमप्राप्त असताना मतमोजणीला सुरुवात होऊन अर्धा तास झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी शिवाजी घुले यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांनी नाष्टा करण्यास सुरुवात केली.
हेही वाचा – पुणे: ‘नॅशनल क्वांटम मिशन’ची प्रत्यक्ष सुरुवात पुढील वर्षी
पुणे जिल्ह्यातील मावळ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अठरा जागांसाठी शुक्रवारी मतदान पार पडले. निवडणुकीच्या रिंगणात एकूण ४० उमेदवार असून थेट आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. मावळ कृषी उत्पन्न बाजार समितीवर कोणाची सत्ता येणार, हे काही तासांत स्पष्ट होणार आहे.
सकाळी नऊच्या सुमारास मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर अर्ध्या तासातच संबंधित मतमोजणी करणारे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मतमोजणी थांबवून नाष्टा करण्यास सुरुवात केली. यामुळे गेल्या अर्ध्या तासापासून मतमोजणीला ब्रेक लागला आहे. नाष्टा होताच पुन्हा मतमोजणीला सुरुवात होईल.