पुणे : ससून रुग्णालयातून २ ऑक्टोबर २०२३ रोजी अमली पदार्थ तस्कर ललित पाटील हा पळून जाण्याची घटना घडली. या घटनेला दहा दिवसांचा कालावधी झाला असून त्याचा शोध सुरू असताना पुणे पोलिसांनी आरोपी ललित पाटील याचा भाऊ भूषण पाटील आणि अभिषेक बलकवडे या दोघा आरोपींना काल उत्तर प्रदेश येथून अटक केली. त्यानंतर आज शिवाजीनगर न्यायालयात हजर केले. त्यावेळी दोघा आरोपींना १६ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
आरोपी भूषण पाटील आणि अभिषेक बलकवडे या दोघा आरोपींना आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी सरकारी वकील आणि पुणे पोलिसांनी आरोपींची १४ दिवसांची पोलीस कोठडी मिळावी अशी मागणी न्यायालयाकडे केली. इतक्या दिवस ललित पाटील तुमच्या ताब्यात होता, त्याला नीट सांभाळता आलं नाही आणि भूषण आणि अभिषेककडे आता काय तपास करणार, पोलीस खाते स्टेकला लागले आहे. त्यामुळे पोलिसांनी कोठडी जास्त मागू नये, असे म्हणत पोलीस कोठडीची मागणी करणाऱ्या पोलिसांना न्यायाधीशांनी सुनावले.
हेही वाचा – अल्पवयीन मुलीला अश्लील चित्रफीत दाखवून अत्याचार करणारा गजाआड
कोणत्याही आरोपीला जास्तीत जास्त १४ दिवस पोलीस कोठडी देता येते. त्यामुळे ललित पाटील जेव्हा पकडला जाईल तेव्हा त्याच्यासोबत भूषण आणि अभिषेकची एकत्रित चौकशी करायची असेल तर त्याची १४ दिवसांची पोलीस कोठडी एकाच वेळेस संपवू नका, अशा शब्दांत न्यायाधीशांनी पुणे पोलिसांना सुनावले. त्यानंतर सरकारी वकील आणि बचाव पक्ष या दोघांचा युक्तिवाद झाल्यानंतर न्यायाधीशांनी १६ ऑक्टोबरपर्यंत आरोपी भूषण पाटील आणि अभिषेक बलकवडे यांना पोलीस कोठडी सुनावली.