खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील चारही धरणांमध्ये यंदा गेल्या तीन वर्षातील सर्वाधिक पाऊस ऑगस्टअखेरपर्यंत पडला असल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले. सन २०२० आणि सन २०२१ या दोन वर्षांत ऑगस्टपर्यंत पडलेल्या पावसापेक्षा यंदा जास्त पाऊस पडला आहे.शहराला टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चार धरणांमधून पाणीपुरवठा केला जातो. या चारही धरणांची पाणीसाठवण क्षमता २९.१५ अब्ज घनफूट (टीएमसी) एवढी आहे. चारही धरणे पूर्ण क्षमतेने भरलेली आहेत. यंदा मोसमी पाऊस सक्रिय झाल्यापासून संपूर्ण जून महिन्यात पावसाने पाठ फिरवली. तसेच यंदा पूर्वमोसमी पावसानेही धरणांच्या परिसरात हजेरी लावली नाही. त्यामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांनी तळ गाठला होता. या पार्श्वभूमीवर पुणे शहरात पाणीकपात करण्याची वेळ आली आणि ४ जुलैपासून पाणीकपातीच्या निर्णयाची अंमलबजावणी देखील सुरू करण्यात आली. मात्र, त्यानंतर धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू झाला आणि पाणीकपात मागे घेण्यात आली. मुसळधार पावसामुळे खडकवासला हे धरण यंदा ११ जुलै रोजीच पूर्ण क्षमतेने भरले आणि या धरणातून मुठा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> जेजुरी : राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ स्थापन करणार- फडणवीस

पानशेत धरण ११ ऑगस्ट, तर वरसगाव हे धरण १३ ऑगस्ट रोजी १०० टक्के भरले. खडकवासला, पानशेत आणि वरसगाव ही तिन्ही धरणे भरल्यानंतर टेमघर धरण १९ ऑगस्ट रोजी पूर्ण क्षमतेने भरले. गेल्या पाच वर्षांपासून या धरणाची दुरुस्ती करण्यात येत आहे. त्यामुळे हे धरण पूर्ण क्षमतेने भरण्यात येत नव्हते. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून टेमघर धरणाची गळती ९० टक्क्यांपर्यंत रोखण्यात यश आल्याने हे धरण १०० टक्के भरण्यात येत आहे, असे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.दरम्यान, यंदा ऑगस्टपर्यंत टेमघर धरण परिसरात २९८२ मिलिमीटर, वरसगाव धरणक्षेत्रात २१६३ मि.मी., पानशेत धरणक्षेत्रात २१७१ मि.मी., तर खडकवासला धरण परिसरात ५२४ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. टेमघर, वरसगाव आणि पानशेत या तिन्ही धरणांमध्ये गेल्या तीन वर्षातील सर्वाधिक पावसाची नोंद करण्यात आली आहे, तर खडकवासला धरणात मात्र सन २०२१ आणि सन २०२० मध्ये यंदापेक्षा जास्त पावसाची नोंद करण्यात आली होती, असेही निरीक्षण जलसंपदा विभागाकडून नोंदविण्यात आले.

गेल्या तीन वर्षांतील चारही धरणांमधील पाऊस मिलिमीटरमध्ये
धरण             २०२२ २०२१ २०२०
टेमघर           २९८२ २४६४ २६३५
वरसगाव        २१६३ १६८६ १९१७
पानशेत         २१७१ १७१३ २०१०
खडकवासला ५२४             ५३१             ६७१

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The dams of the khadakwasla dam chain project have received the highest rainfall in the last three years this year pune print news amy