पुणे : कोथरूड परिसरात सातत्याने डुकरांचा मृत्यू होण्याचे कारण अखेर समोर आले आहे. या डुकरांवर विषप्रयोग करण्यात आल्याचे त्यांच्या शवविच्छेदनातून उघड झाले आहे. या प्रकरणी महापालिकेच्या आरोग्य विभागाने भरारी पथक नेमले असून, ते परिसरात तपासणी करीत आहे.
कोथरूडमध्ये भारती नगर नाला आणि भिमाले कॉर्नर परिसरात ६ फेब्रुवारीपासून मृत डुकरे आढळून येत आहेत. आतापर्यंत या परिसरात ५४ मृत डुकरे आढळली आहेत. यातील एका डुकराचे शवविच्छेदन करण्यात आले. पशुसंवर्धन विभागाच्या रोग नियंत्रण केंद्राने या डुकराच्या अवयवांची तपासणी केली. त्या वेळी या डुकराच्या अवयवांमध्ये कार्बामेट हे विष आढळून आले. त्यामुळे कोथरूड परिसरातील डुकरांवर विषप्रयोग झाल्याची बाब अखेर उघड झाली आहे. याचबरोबर डुकरांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी भोपाळमधील उच्च सुरक्षा पशुरोग संस्थेकडे पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती महापालिकेच्या मुख्य पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सारिका फुंडे यांनी दिली.
डुकरांवर कोणत्या माध्यमातून विषप्रयोग झाला, याचा शोध महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून घेतला जात आहे. यासाठी कोथरूड परिसरातील नाल्यामधील पाण्याचे नमुने घेऊन त्यांची तपासणी करण्यात आली. या तपासणीत पाण्यामध्ये विषारी पदार्थ आढळून आले नाहीत. त्यामुळे कोणी तरी खाद्यपदार्थांमधून डुकरांना विष दिले असण्याची शक्यता आहे. डुकरांच्या मालकाचा शोधही घेण्यात येत असून, तो सापडलेला नाही. त्यामुळे या विषप्रयोगामागील नेमके कारण समोर आलेले नाही, असे डॉ. फुंडे यांनी स्पष्ट केले.
डुकरे पकडण्यावर भर
महापालिकेने शहरातील डुकरे पकडून त्यांची कत्तल करण्यासाठी ठेकेदार नेमले आहेत. हे ठेकेदार डुकरे पकडून कत्तलखान्यात पाठवितात. महापालिकेच्या ठेकेदाराने कोथरूड परिसरात ६ ते १७ फेब्रुवारी या कालावधीत १७१ डुकरे पकडली आहेत. या डुकरांना कत्तलखान्यात पाठवून त्यांची कत्तल करण्यात आली आहे.
कोथरूड परिसरात मृत डुकरे आढळून येत असल्याने तिथे भरारी पथक नेमण्यात आले आहे. हे पथक सातत्याने त्या परिसरात पाहणी करीत आहे. डुकरांचा मृत्यू झाल्याने एखादा आजार पसरू नये, यासाठी तिथे कीटकनाशक फवारणी केली जात आहे.- डॉ. सारिका फुंडे, मुख्य पशुवैद्यकीय अधिकारी, महापालिका
कोथरूड परिसरातील डुकरांचा मृत्यू
तारीख – मृत डुकरे
६/०२/२०२५ – १६
७/०२/२०२५ – ०८
१०/०२/२०२५ – ०५
११/०२/२०२५ – ०२
१२/०२/२०२५ – ०२
१३/०२/२०२५ – ०१
१४/०२/२०२५ – ०६
१५/०२/२०२५ – ०९
१६/०२/२०२५ – ०३
१७/०२/२०२५ – ०२
एकूण मृत्यू – ५४