पुणे : गेल्या काही काळात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात घडलेल्या अनुचित घटनांमुळे विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थी संघटनांसाठी मार्गदर्शक कार्यपद्धती प्रस्तावित केली होती. मात्र विद्यार्थी संघटनांनी या कार्यपद्धतीला विरोध केल्याने ही कार्यपद्धती स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने तयार केलेल्या मार्गदर्शक कार्यपद्धतीबाबत विद्यार्थी संघटनांशी चर्चा करण्यासाठी सोमवारी बैठक आयोजित करण्यात आली होती. कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, प्रभारी कुलसचिव डॉ. विजय खरे, विविध विद्यार्थी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. कुलगुरूंनी कार्यपद्धती तयार करण्यामागील भूमिका मांडली. मात्र तसेच आजवर कधीच तयार न केलेली कार्यपद्धती करण्याची गरज विद्यापीठाला का निर्माण झाली असा प्रश्न उपस्थित करत विद्यार्थी संघटनांनी या कार्यपद्धतीला विरोध दर्शवला.

हेही वाचा >>>शरद मोहोळ हत्या प्रकरण : माझा नवरा वाघ होता आणि मी त्याची वाघीण- स्वाती मोहोळ

विद्यार्थ्यांना आंदोलन, उपक्रमासाठी पाच दिवस आधी पूर्वसूचना देऊन विद्यापीठ, पोलिस प्रशासनाची परवानगी घेणे, आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडल्यास संबंधित संघटना त्यास जबाबदार राहील. तसेच आंदोलनामुळे विद्यापीठाच्या मालमत्तेचे नुकसान होणार नाही याची लेखी हमी, असे मुद्दे कार्यपद्धतीमध्ये प्रस्तावित करण्यात आले होते. मात्र विद्यार्थी संघटनांनी विरोध केल्यानंतर विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. विजय खरे यांनी कार्यपद्धती स्थगित करत असल्याचे जाहीर केले.  विद्यापीठाने प्रस्तावित कार्यपद्धतीचा मसुदा जाहीर केल्यानंतर माजी अधिसभा सदस्य प्रा. धनंजय कुलकर्णी यांनी या कार्यपद्धतीला विरोध केला होता. विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर, आंदोलन करण्याच्या हक्कावर ही कार्यपद्धती गदा आणत असल्याची भूमिका मांडली होती. त्या वाबतचे वृत्त लोकसत्ताने प्रसिद्ध केले होते. कार्यपद्धती स्थगितीच्या निर्णयावर प्रा. कुलकर्णी म्हणाले, की कार्यपद्धती स्थगित करण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. विद्यार्थ्यांचे आंदोलन, संघटन स्वातंत्र्य अबाधित राहिले आहे. हा लोकशाहीचा विजय आहे. सर्व घटकांच्या भावना लक्षात घेऊन प्रस्तावित कार्यपद्धती स्थगित करण्यात आली आहे. विद्यापीठ प्रशासनाला सर्व घटकांचे सहकार्य अपेक्षित आहे, असे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी म्हणाले.

दरम्यान, विद्यापीठात पोलिसांचा अनावश्यक हस्तक्षेप टाळला पाहिजे. देशाच्या घटनेने प्रत्येक नागरिकाला दिलेला आंदोलनाचा अधिकार जपला गेला पाहिजे. विद्यापीठाने प्रस्तावित कार्यपद्धती रद्द केली याचे स्वागत आहे, असे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पुणे महानगरमंत्री यांनी हर्षवर्धन हरपुडे सांगितले. तर   विद्यापीठाच्या स्थापनेपासून अशी कार्यपद्धती केलेली नाही. त्यामुळे विद्यार्थी संघटनांच्या विरोधामुळे जाचक अटी लादण्याचा प्रयत्न विद्यापीठाला मागे घ्यावा लागला. कार्यपद्धती रद्द करण्याच्या निर्णयाचे स्वागत आहे, असे मत युवक काँग्रेस माध्यम विभागाचे अध्यक्ष अक्षय जैन यांनी मांडले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The decision of the university to suspend the proposed procedure that brought heel on the student agitations pune print news ccp 14 amy
Show comments