पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी या पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील दोन मेट्रो मार्गिकांना एकत्र जोडणारे शिवाजीनगर भूमिगत स्थानकाची कामे वेगाने सुरू आहेत. शिवाजीनगर भूमिगत स्थानकाची खोली जमिनीच्या १०८ फूट खाली (३३.१ मीटर) एवढी असून, शिवाजीनगर भूमिगत स्थानक देशातील सर्वाधिक खोल स्थानक ठरले आहे.
हेही वाचा- उच्च शिक्षण संस्थांचे नव्या निकषांद्वारे मूल्यांकन; ‘नॅक’कडून नवे निकष, गुणभार जाहीर
दरम्यान, शिवाजीनगर बहुउद्देशीय वाहतूक केंद्राची विविध कामांनीही वेग घेतला आहे. मेट्रो प्रकल्पाच्या पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या १७ किलोमीटर आणि वनाज ते रामवाडी या १६ किलोमीटर अंतराच्या दोन मार्गिकांची कामे सुरू आहेत. या दोन्ही मार्गिका शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालय स्थानकात एकमेकांना छेदणार आहेत. त्यामुळे शिवाजीनगर भूमिगत स्थानक महत्त्वाचे आहे. वनाज ते रामवाडी ही उन्नत मार्गिका आणि पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या मार्गिकेमधील रेंजहिल्स ते स्वारगेट ही भूमिगत मेट्रो मार्गिका या स्थानकात एकत्र येणार आहेत. त्या दृष्टीने स्थानकाच्या उभारणीचे काम सुरू झाले आहे. सरकते जिने आणि उदवाहक (लिफ्ट) यांनी उन्नत आणि भूमिगत मेट्रो मार्गिका जोडण्यात येणार आहेत.
हेही वाचा- पुणे : पोलिसांनी काढली आरोपींची धिंड; तरुणाचा खुनाचा कट उधळला, आरोपींकडून कोयता, कुऱ्हाड, तलवार जप्त
या भूमिगत स्थानकाची खोली ३३.१ (१०८.५९ फूट) एवढी आहे. देशातील सर्वाधिक खोल स्थानक म्हणून शिवाजीनगर स्थानकाची नोंद झाली आहे. भूमिगत स्थानकाचे छत ९५ फूट उंच असून तेथे थेट सूर्यप्रकाश किंवा नैसर्गिक प्रकाश पडेल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. या प्रकारचे वैशिष्ट्य असलेले हे एकमेव स्थानक आहे. मेट्रो स्थानकाला डेंगळे पूल, कामगार पुतळा आणि पुणे जिल्हा सत्र न्यायालय या बाजूंनी प्रवाशांना येण्याजाण्यासाठी पादचारी आणि अन्य वाहतूक व्यवस्था करण्यात आली आहे. शिवाजीगनर ते हिंजवडी ही मेट्रो मार्गिकाही याच भूमिगत स्थानकाला जोडली जाणार आहे. त्यामुळे शिवाजीनगर भूमिगत स्थानक मेट्रो मार्गिकांचे मध्यवर्ती स्थानक ठरणार आहे. या स्थानकात आठ उदवाहक आणि अठरा सरकते जिने बसविण्यात येणार आहेत.
या मध्यवर्ती स्थानकाचा एकूण परिसर ११.१७ एकर असून स्थानकामध्ये येण्या-जाण्यासाठी एकूण सात दरवाजे असतील. पार्किंगची सुविधाही यामध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. ड्राॅप ॲण्ड गो साठी स्वतंत्र मार्गिका असून मल्टी मोडल इंटिग्रेशनसाठी पीएमपीचा थांबाही येथे असणार आहे. सध्या या स्थानकाच्या कामांनी वेग घेतला असून येत्या काही दिवसांत ही सर्व कामे नियोजित वेळेत पूर्ण होतील, असा दावा महामेट्रोकडून करण्यात आला आहे.
हेही वाचा- पुणे : शिक्षण विभागात आता पूर्वपरवानगीनेच रजा
दरम्यान, येत्या दोन महिन्यात फुगेवाडी ते शिवाजीनगर न्यायालय आणि पिंपरी-चिंचवड ते शिवाजीनगर या मार्गिकांची कामे पूर्ण करण्यात येणार आहेत. या दोन्ही मार्गांवर काही दिवसांपूर्वी मेट्रोची चाचणी घेण्यात आली. मार्ग प्रवाशांसाठी खुले झाल्यानंतर पुणे आणि पिंपरी-चिंचवड ही जुळी शहरे मेट्रोसारख्या मास ट्रान्झिट वाहतूक व्यवस्थेने जोडली जाणार आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या वेळेचीही बचत होणार असून पिंपरी-चिंचवड ते वनाज या २२ किलोमीटर अंतराचा प्रवास केवळ ३१ मिनिटांमध्ये पूर्ण होणार आहे.