पुणे: सर्वत्र महागाई आणि मंदीची चर्चा सुरू असताना जिल्हा प्रशासनाने मात्र ‘स्वस्ताई’ आणली आहे. लोकसभा निवडणूक खर्चाचा हिशेब ठेवण्यासाठी निश्चित करण्यात आलेल्या दरसूचीत खाद्यपदार्थांसह प्रचार साहित्याची दरसूची जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये प्रचार खर्च वाढवून देण्याची मागणी करणाऱ्या राजकीय पक्षांना यामुळे दिलासा मिळणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

निवडणूक खर्चाचा हिशेब सादर करण्यात सुसूत्रता येण्यासाठी निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांना दरसूची ठरवून दिली जाते. त्यानुसार उमेदवारांना खाद्य पदार्थ आणि प्रचार साहित्याचा खर्च दाखवावा लागतो. लोकसभा निवडणुकीसाठी प्रत्येक उमेदवाराला ९५ लाख रुपये खर्च करण्यास मुभा आहे. दरसूचीमध्ये शाकाहारी जेवण ८० रुपये, मांसाहारी जेवण २०० रुपये, चहा दहा रुपये, कॉफी १५ रुपये, वडापाव, पोहे आणि उपमा प्रत्येकी १५ रुपये, साबुदाणा खिचडी २० रुपये, पाण्याचा जार (२० लि.) ३५ रुपये असे दरपत्रक जाहीर झाले आहे. परिणामी कमी पैशांत जादा वस्तू घेता येणार असल्याने कार्यकर्त्यांमधून ‘होऊ द्या खर्च’ची मागणी वाढणार असून खर्च सादर करणाऱ्या कार्यकर्त्यांची दमछाक टाळण्यास थोडी मदत होणार आहे.

हेही वाचा >>>Rahul Gandhi Case : “पोलीस तपासांत एवढा विलंब का?”, सात्यकी सावरकर यांचा थेट सवाल

दरम्यान, उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रत्येक दिवसाचा केलेला खर्च उमेदवारांना सादर करावा लागतो. हा खर्च सादर करताना प्रचारासाठी वापरण्यात येणाऱ्या प्रत्येक साहित्याचा हिशोब निश्चित केलेल्या दरपत्रकाप्रमाणे उमेदवाराला द्यावा लागतो. प्रचारासाठी वापरण्यात येणाऱ्या झेंड्यापासून ते सभामंडप उभारण्यासाठी लागणाऱ्या साहित्यापर्यंत, प्रचारासाठी लावण्यात येणारी वाहने, प्रचारफेरी, मिरवणूक काढताना लावण्यात येणारे ढोल-ताशे, बँडपथक आणि वाहने, सत्कारासाठी वापरण्यात येणारे फेटे, पगडी, पुष्पगुच्छ, चहा, न्याहरी, जेवण, याचा या दरपत्रकामध्ये समावेश करण्यात आला आहे.

जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेले दरपत्रक, कंसात रुपये

कापडी मंडप (पत्राशेडसह) प्रति चौ.फूट (३०), फायबर/प्लास्टिक खुर्ची (दहा), हारतुरे लहान (१२०), फटाके एक हजाराची माळ (१८०), साधा फेटा (१००), एक्झिक्युटिव्ह खुर्ची (३००), झेंडा १८ बाय २८ इंच (दहा), छापिल उपरणे (दहा), रिक्षा प्रतिदिन ध्वनीक्षेपक यंत्रणेसह (२०००), बाटलीबंद पाणी २५० एमएल १२ नग (९०), पाण्याचा जार २० लि. (३५), फूड पॅकेट- पाच पुरी, सुकी भाजी, लोणचे व चटणी प्रतिताट (५५)

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The district administration announced the list of campaign materials along with food items in the list fixed to account for lok sabha election expenses pune print news psg 17 amy