पुणे : जिल्ह्यात सर्वात कमी मतदारसंख्या असलेल्या कसबा मतदारसंघात सन २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत कमी म्हणजेच ५१ टक्के मतदान झाले होते. त्यामुळे पोटनिवडणुकीसाठी रविवारी (२६ फेब्रुवारी) प्रत्यक्ष मतदान होणार असून मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली आहे. स्वीप मोहिमेंतर्गत शुक्रवारी मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांच्या उपस्थितीत शनिवारवाड्यावर जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तसेच मतदारसंघातील विविध ठिकाणी भेट देऊन अधिकाधिक मतदान करण्यासाठी आवाहन करण्यात येणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मतदार यादीतील नाव शोधण्यापासून ते मतदान केंद्रांवर पोहोचविण्यासाठी सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. सुटीच्या दिवशी मतदान असल्याने जास्तीतजास्त मतदारांनी आणि नवमतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी शुक्रवारी केले. जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदार संघांत पुणे कॅन्टोन्मेंटनंतर सर्वात कमी दोन लाख ७५ हजार ४२८ मतदारसंख्या असलेल्या कसबा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. सुशिक्षित मतदार अशी ओळख असलेल्या या मतदारसंघात प्रत्यक्ष मतदानाचा टक्का वाढत नसल्याचे गेल्या काही निवडणुकांत दिसून आले आहे.

हेही वाचा >>> पुणे : कसबा, चिंचवडमध्ये छुप्या प्रचारावर प्रशासनाचा ‘वाॅच’

पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान वाढावे यासाठी प्रशासकीय पातळीवर अनेक मोहिमा राबविण्यात आल्या असून प्रथमच ८० वर्षांपुढील आणि शारीरिक विकलांग मतदारांसाठी टपाली मतदानाची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. या मतदारसंघात २७० मतदान केंद्रे असून सर्व केंद्रे तळमजल्यावर करण्यात आली आहेत. मतदान जनजागृती मोहिमेंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत असून वंचित घटकांसाठी खास मतदार जनजागृती कार्यक्रम, व्याख्याने, शालेय विद्यार्थ्यांच्या फेरी, कार्यशाळा, चर्चासत्र, प्रश्नमंजुषा, प्रात्यक्षिके, रांगोळी-चित्रकला-फलक स्पर्धा आयोजित केल्या होत्या. तसेच मतदार यादीत सहज नाव शोधण्यासाठी केवायसी (नो युवर कॅन्डीडेट) हे उपयोजन तयार करण्यात आले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The district administration to increase the voting pune print news psg 17 ysh