जिल्हा प्रशासनाकडून दर महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी सर्व तालुक्यात क्षेत्रीय स्तरावर फेरफार अदालतीचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार उद्या (१२ ऑक्टोबर) फेरफार अदालत आयोजित करण्यात आली असून नागरिकांनी फेरफारविषयक प्रलंबित नोंदी निकाली काढून घ्याव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले आहे.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जनतेच्या कामकाजाचा निपटारा होण्याच्या दृष्टीने फेरफार अदालतीच्या वेळेस फेरफार अदालतीशिवाय नागरिकांच्या इतर कामकाजामध्ये सातबारामधील त्रुटी दुरुस्त करणे, तक्रार नोंदी विहीत मुदतीत निकाली काढणे, नागरिकांच्या तक्रारी अर्जाचे तालुका स्तरावर तक्रारींचे निवारण करणे. संजय गांधी लाभार्थ्याचे अर्ज स्वीकारणे, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामकाजासाठी जातीचे, उत्पन्नाचे आणि इतर दाखले वितरीत करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत.