पुणे : राज्यातील शिक्षकांना दिल्या जाणाऱ्या विविध कामांचे शैक्षणिक आणि अशैक्षणिक असे स्वरुप शिक्षण विभागाने आता निश्चित केले आहे. त्यानुसार अशैक्षणिक कामे शिक्षकांना न देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शालेय शिक्षण विभागाने या बाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला. शिक्षण हक्क कायदा २००९मधील कलम २७नुसार शिक्षकांना अशैक्षणिक कामांसाठी नियुक्त करण्यास मनाई करण्यात आली आहे. राज्यातील सर्व मुलांना गुणवत्तापूर्ण, दर्जेदार शिक्षण देण्यासाठी शिक्षण हक्क कायद्यानुसार वर्षातून प्राथमिक वर्गासाठी किमान २०० दिवस, उच्च प्राथमिक वर्गासाठी किमान २२० दिवस अध्यापन होणे बंधनकारक आहे. असे असूनही शिक्षकांना अशैक्षणिक कामे दिली जातात. या अशैक्षणिक कामांमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि सर्वांगीण विकासावर बाधक परिणाम होतो. त्यामुळे विविध संघटनांकडून शिक्षकांना अशैक्षणिक कामे न देण्याबाबत दिली जाणारी निवेदने, आमदारांकडून होणारी मागणी विचारात घेऊन शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करण्यात आली होती. या समितीने शैक्षणिक आणि अशैक्षणिक कामांचे अ, ब, क असे वर्गीकरण करून शासनाला अहवाल सादर केला होता. त्यानुसार शिक्षण विभागाशी संबंध नाही किंवा अन्य विभागांकडून परंपरागत जी कामे शिक्षकांना दिली जातात, शिक्षकांचा संबंध नसलेली माहिती भरण्याची कामे, अन्य साधने वापरून पूर्ण करता येऊ शकतात अशी कामे अशैक्षणिक म्हणून निश्चित करण्यात आली आहेत. तर आरटीई २००९नुसार अनिवार्य कामांमध्ये जनगणना, आपत्ती निवारणाची कामे, स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा, लोकसभा निवडणुकीच्या कामांचा समावेश आहे.

हेही वाचा >>>पुणे : मद्यधुंद शिवशाही चालकाची मोटारीला धडक

अध्यापन कार्य, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार पूर्वप्राथमिक वर्गासंदर्भातील अध्यापन आणि इतर अनुषंगिक कामे, युडायस आणि सरल प्रणालीत आवश्यक माहिती भरणे, त्याचे अद्ययावतीकरण करणे, शाळेत न जाणाऱ्या मुलांचा शोध घेऊन जवळच्या शाळेत त्यांची नावनोंदणी करणे, नवसाक्षरांचे सर्वेक्षण, गैरहजर मुलांच्या पालकांच्या भेटी घेऊन त्यांचे उद्बोधन, शाळापूर्व तयारी, शाळेत दाखलपात्र मुलांचा शोध, शाळा सुधार योजनेअंतर्गत लोकसहभागाची माहिती भरणे, नवभारत साक्षरता अभियानाअंतर्गत कामे, योजनांसाठी अत्यावश्यक माहिती शासन, स्थानिक स्वराज्य संस्थांकडे उपलब्ध नसलेली माहिती ऑनलाइन, ऑफलाइन पद्धतीने मागवणे, ही माहिती स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या यंत्रणेमार्फत संकलित करणे, अध्यापनात अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरासाठी राज्य शासन, राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद यांची विकसित केलेले, शिफारस केलेले विविध मोबाइल उपयोजनांचा वापर, अभिलेखे जतन करणे, विद्यार्थ्यांच्या अध्ययन निष्पत्तीकडे लक्ष देणे, शिष्यवृत्ती परीक्षांची तयारी करून घेणे, कला-क्रीडा स्पर्धा, अभ्यास सहलींचे आयोजन, अभ्यासक्रम, पाठ्यक्रम, पाठ्यपुस्तके विकसन, संशोधन आणि मूल्यमापन विकसन, प्रशिक्षण रचना त्याअनुषंगाने होणाऱ्या प्रशिक्षण कार्यक्रमात सहभाग, शाळा स्तरावरील विविध समित्यांवर अध्यक्ष किंवा सचिव म्हणून कामकाज, क्षमता संवर्धन विकसनासाठी शासकीय संस्थांच्या प्रशिक्षण शिबिरास उपस्थिती ही कामे शैक्षणिक म्हणून निश्चित करण्यात आली आहेत.

अशैक्षणिक कामे कोणती?

गावातील स्वच्छता अभियान, प्रत्यक्ष निवडणुकीतील कामे वगळता अन्य निवडणूक विषयक नियमित कामे, हागणदारीमुक्त अभियान राबवणे, विविध प्रकारची सर्वेक्षणे, शालेय कामकाजाव्यतिरिक्त अन्य विभागांची माहिती संकलित करून ती त्या विभागाचे उपयोजन किंवा संकेतस्थळावर भरणे, ऑनलाइन उपलब्ध असलेली माहिती ऑफलाइन पद्धतीने दुबार मागवणे, शासन मान्यता नसलेल्या कामात सहभाग, शिक्षण विभागाव्यतिरिक्त अन्य विभागांकडून दिली जाणारी कामे अशी कामे अशैक्षणिक म्हणून निश्चित करण्यात आली आहेत. तसेच अशैक्षणिक कामे शिक्षकांना न देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.