ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत मुदत संपणाऱ्या आणि नव्याने स्थापन होणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. जिल्ह्यात अशा २२१ ग्रामपंचायती असून त्यांची निवडणूक प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.या ग्रामपंचायतींच्या प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करण्यात येणार आहेत. या निवडणुकांसाठी संगणकप्रणालीद्वारे प्रभागनिहाय मतदार यादी कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी १३ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यावर १८ ऑक्टोबरपर्यंत हरकती व सूचना दाखल करता येणार आहेत.
हेही वाचा >>>पुण्यातील जनता वसाहत परिसरात रिक्षा चालकाचा खून ; तिघांविरूद्ध गुन्हा दाखल
अंतिम मतदार यादी २१ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यातील २८, भोरमधील ५४, दौंडमधील आठ, बारामतीमधील १३, इंदापुरातील २६, जुन्नरमधील १७, आंबेगावमधील २१, खेडमधील २३, शिरूरमधील चार, मावळातील नऊ, मुळशीतील ११ आणि हवेलीतील सात अशा एकूण २२१ ग्रामपंचायतींचा समावेश आहे, असे जिल्हा ग्रामपंचायत शाखेकडून सांगण्यात आले.