पुणे : ईव्ही टेक इंडिया एक्स्पोचे आयोजन ७ ते ९ मार्चदरम्यान पिंपरीतील ऑटो क्लस्टर एक्झिबिशन सेंटर येथे करण्यात आले आहे. या प्रदर्शनात वाहन उद्योग क्षेत्रातील व्यावसायिक, उत्पादक, धोरणकर्ते आणि गुंतवणूकदार एकत्र येऊन इलेक्ट्रिक वाहन, बॅटरी तंत्रज्ञान आणि चार्जिंग पायाभूत सुविधांमधील नवकल्पना सादर करणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ईव्ही टेक इंडिया एक्स्पोमध्ये १०० हून अधिक प्रदर्शक सहभागी होतील. तसेच १० हजारांहून व्यावसायिक आणि ई-वाहन उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी उपस्थित राहतील. यामध्ये देश-विदेशातील इलेक्ट्रिक वाहन उत्पादक, सुट्या भागांचे पुरवठादार आणि चार्जिंग पायाभूत सुविधा पुरविणाऱ्या कंपन्या सहभागी होतील. अत्याधुनिक बॅटरी तंत्रज्ञानापासून ते पुढील पिढीच्या ऊर्जा कार्यक्षम मोबिलिटी सिस्टीम्सपर्यंत अनेक नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान अनुभवण्याची संधी या प्रदर्शनाच्या माध्यमातून मिळेल.

ग्लोब-टेक मीडियाच्या आयोजनाखाली होणाऱ्या या एक्स्पोला नॅशनल हायवेज फॉर इलेक्ट्रिक व्हेइकल्स, सोसायटी फॉर स्मार्ट ई-मोबिलिटी, टेस्टिंग इन्स्ट्रुमेंट्स इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री यांसारख्या प्रमुख औद्योगिक संस्थांचे सहकार्य लाभले आहे. या प्रदर्शनात ई-वाहनांचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी देण्यासाठी एक विशेष टेस्ट ड्राईव्ह विभागही असेल. येथे अत्याधुनिक इलेक्ट्रिक मोटार आणि दुचाकी चालवून त्यांची कामगिरी, कार्यक्षमता यांचा अनुभव प्रत्यक्ष जाणून घेता येईल.

ईव्ही टेक इंडिया एक्स्पो हे देशातील इलेक्ट्रिक मोबिलिटीच्या भविष्यातील दिशादर्शनासाठी महत्त्वाचा मंच आहे. या वेगाने वाढणाऱ्या उद्योगात हा एक्स्पो शाश्वत वाहतूक उपायांना चालना देण्याची भूमिका बजावेल. आम्ही उद्योजक, संशोधक आणि धोरणकर्त्यांना एकत्र आणून नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान आणि सहयोगाच्या संधी निर्माण करण्यास कटिबद्ध आहोत, असे ईव्ही टेक इंडिया एक्स्पोचे प्रकल्प संचालक मुकेश यादव यांनी सांगितले.

गेल्या काही वर्षांत भारतीय ईव्ही मार्केट वेगाने वाढत आहे. ई-वाहन विक्रीत २०२४ मध्ये २६.५ टक्के वाढ झाली असून, एकूण १९.४ लाख वाहनांची विक्री झाली. या वाढीचे मुख्य कारण म्हणजे सरकारच्या अनुकूल प्रोत्साहन योजना, नवीन ईव्ही मॉडेल्सची वाढती संख्या आणि चार्जिंग पायाभूत सुविधांचा विस्तार हे आहे. आगामी काळात भारतीय ई-वाहन बाजारपेठ आणखी मोठ्या प्रमाणात विस्तारणार आहे, असेही यादव यांनी नमूद केले.