पुणे: पुणे रेल्वे स्थानकाच्या विस्तारकरणाच्या कामाला अखेर गती मिळाली आहे. विस्तारीकरणाआधीचे प्राथमिक टप्प्यावरील काम वेगाने सुरू झाले आहे. प्राथमिक टप्प्याचे काम ३० टक्के पूर्ण झाले असून, त्यासाठी ५१ कोटी ८५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
प्राथमिक टप्प्यावरील कामामध्ये स्थानकातील फलाट क्रमांक २,३ आणि ६ ची लांबी वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे या फलाटांवर २४ एलएचबी डबे आणि २६ आयसीएफ डब्यांड्या गाड्या थांबू शकणार आहेत. याचबरोबर फलाट क्रमांक ३ चे गाडी जाण्याच्या मुख्य मार्गामध्ये आणि फलाट क्रमांक चारचे गाड्या जाण्याच्या मुख्य मार्गामध्ये रुपांतर केले जाणा रआहे. फलाट क्रमांक १ व २ च्या मध्ये मालवाहू गाड्यांसाठी दोन वेगळे मार्ग तयार केले जाणार आहेत.
हेही वाचा… मर्जीतील अधिकाऱ्यांवरून दोन ज्येष्ठ मंत्र्यांमध्ये जुंपली; पुणे जिल्हा प्रशासनामध्ये अस्वस्थता
सध्या प्राथमिक टप्प्यातील मार्ग क्रमांक ६ आणि ८ चे मुंबईच्या बाजूचे विस्तारीकरण करण्यात आले आहे. तिथे लोहमार्गांचे काम सुरू असून, ओव्हरहेड वायरचे कामही लवकरच सुरू होणार आहे. सिग्नल यंत्रणेचे काम सुरू असून, तिथे रिले रूमसाठी वेगळी व्यवस्था निर्माण केली जात आहे. प्राथमिक टप्प्यावरील काम पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष रेल्वे स्थानकाच्या विस्तारीकरणाचे काम सुरू होईल. त्यासाठी दिवाळीनंतरचा मुहूर्त निघण्याची शक्यता आहे. विस्तारीकरणाचे काम १०७ दिवसांत पूर्ण करण्याचे रेल्वेचे नियोजन आहे.