पुणे : राजस्थानमधील प्रसिद्ध धार्मिक केंद्र खाटूश्याम आता थेट रेल्वेने जोडले जाणार आहे. या लोहमार्गाच्या सर्वेक्षणास मंजुरी देण्यात आली. त्यानंतर लोहमार्गाचे काम सुरू होणार आहे. दरवर्षी दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांची सोय होणार आहे.
खाटूश्याम मंदिरात दररोज सरासरी ३० हजार भाविक दर्शनासाठी येतात. शुक्रवार, शनिवार आणि रविवारी सरासरी चार ते पाच लाख भाविक दर्शनासाठी येतात. एकादशीला भाविकांची संख्या १० लाखांवर जाते. मार्चमध्ये भरणाऱ्या १५ दिवसांच्या मेळ्याला सुमारे ३० लाख ते ४० लाख भाविक येत असतात. हे मंदिर भाविकांनी सर्वाधिक भेट दिलेल्या भारतीय मंदिरांपैकी एक आहे. रेल्वेने येणारे भाविक रिंगसपर्यंत रेल्वेने येतात. त्यानंतर विविध मार्गाने ते खाटू येथे पोहोचतात. रेल्वेने आता रिंगस ते खाटूश्याम या नवीन लोहमार्गाच्या सर्वेक्षणास मंजुरी दिली आहे.
हेही वाचा – पुणे: अवकाळी पाऊस, गारपीटीमुळे फळभाज्यांची आवक कमी, कोथिंबीर, मेथीच्या दरांत वाढ
रिंगस ते खाटू हा प्रवास सोपा आणि सुरक्षित करण्यासाठी रेल्वेने सांस्कृतिक वारसा आणि धार्मिक केंद्रे जोडण्याच्या योजनेअंतर्गत लोहमार्गाला मंजुरी दिली आहे. लोहमार्गाच्या सर्वेक्षणाचे काम लवकरच पूर्ण केले जाणार आहे. या नवीन लोहमार्गाच्या कामाला मंजुरी दिल्यानंतर लवकरात लवकर खाटूश्यामपर्यंत भाविकांना रेल्वेची सुविधा मिळावी यासाठी कामाला सुरुवात करण्यात येईल, असे रेल्वे विभागाने म्हटले आहे.