पुणे : सोलापूर रस्त्यावरील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी मार्गातील अडथळे हटविण्यात येणार असून, त्यामध्ये अनावश्यक ठरणारा बीआरटी मार्गही काढण्यात येणार आहे. तसेच पदपथांची रुंदी कमी करण्यात येणार असून, काही ठिकाणचे सायकल मार्गही काढले जाणार आहेत. त्यामुळे सोलापूर रस्त्यावरील बीआरटी मार्ग काढण्याची परंपरा कायम राहिली असून, बीआरटी मार्गाच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे-सोलापूर रस्त्यावर वाहतुकीची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. पंधरा वर्षांपूर्वी सोलापूर रस्त्यावर प्रायोगिक तत्त्वावर बीआरटी मार्ग करण्यात आला. कात्रज ते हडपसर या मार्गासाठी महापालिकेने १०० कोटी रुपयांचा खर्च केला. मात्र, बीआरटी मार्गामुळेच वाहतूककोंडीत भर पडत असल्याने या बीआरटी मार्गाला सर्वपक्षीय विरोध सुरू झाला आणि बीआरटी मार्गाचे अस्तित्व संपुष्टात येण्यास सुरुवात झाली. त्यात आता रस्ता वाहतुकीसाठी प्रशस्त करण्याच्या निमित्ताने महापालिका प्रशासनाकडूनही बीआरटी मार्गाचा काही भाग काढण्यात येणार आहे.

हेही वाचा >>> सनसिटी-कर्वेनगर उड्डाणपुलाचे काम रखडले! सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडी कायम

भैरोबा नाला चौक ते आकाशवाणी या दरम्यानचा रस्ता पहिल्या टप्प्यात प्रशस्त केला जाणार आहे. त्यामुळे रस्त्यातील अतिक्रमणे दूर करण्यासंदर्भात महापालिका, पीएमपी, प्रादेशिक परिवहन विभाग आणि वाहतूक पोलीस यांच्यात गेल्या आठवड्यात बैठक झाली होती. त्या बैठकीमध्ये वाहतूककोंडी दूर करण्यासंदर्भात आणि रस्त्यावरील सर्व प्रकारचे अडथळे दूर करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. त्यानुसार ही कार्यवाही महापालिका प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे. रस्ते प्रशस्त करण्यासंदर्भातील अडथळे दूर केल्यानंतर चार मार्गिका उपलब्ध होणार आहेत, असा दावा महापालिका प्रशासनाकडून करण्यात आला आहे.

हेही वाचा >>> दहीहंडीनिमित्त पीएमपीच्या मार्गात आज तात्पुरता बदल

या अंतरातील अनावश्यक ठरणारा बीआरटी मार्ग काढला जाणार आहे. तसेच पदपथांची आणि सेवा रस्त्यांची रुंदीही कमी केली जाणार आहे. पदपथालगतचे सायकल मार्गही हटविण्यात येणार आहेत. बीआरटी थांबेही रस्त्याच्या कडेला बसविले जाणार आहेत. भैरोबा नाला चौक ते आकाशवाणी हा रस्ता सध्या ४५ मीटर रुंदीचा आहे. मात्र, त्यामध्ये दहा मीटर रुंदीचा बीआरटी मार्ग असून, दोन्ही बाजूला प्रत्येकी चार मीटर रुंदीचे पदपथ आणि सायकल मार्ग आहेत. काही ठिकाणी साडेसात मीटर रुंदीचे सेवा रस्ते ठेवण्यात आले आहेत. या अडथळ्यांमुळे आणि दुभाजक, तसेच अन्य अतिक्रमणामुळे सुमारे २४ मीटर रुंदीच्या रस्त्याचा वापर होत नाही. काही ठिकाणी सलग बीआरटी मार्ग नाही. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे, असा दावा महापालिका प्रशासनाकडून करण्यात आला आहे.

अडथळे हटविल्यानंतर सोलापूर रस्त्यावर चार मार्गिका उपलब्ध होणार आहेत. सध्या केवळ दोन मार्गिका आहेत. सेवा रस्ते आणि पदपथांवर अतिक्रमण होत असल्याने ती काढून रस्ता मोकळा करण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. सर्व विभागांच्या सहमतीनंतरच या निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल. – व्ही. जी. कुलकर्णी, मुख्य अभियंता, पथ विभाग

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The first brt route ceases to exist for solapur road pune print news apk 13 ysh
Show comments