पुणे : चांदणी चौकातील जुना उड्डाणपूल २ ऑक्टोबरला पाडण्याचे निश्चित झाले आहे. या ठिकाणी होणारी वाहतूक पाहता हा पूल मध्यरात्री पाडण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (नॅशलन हायवेज ॲथॉरिटी ऑफ इंडिया – एनएचएआय), उड्डाणपूल पाडणाऱ्या कंपनीचे प्रतिनिधी, वाहतूक पोलीस यांसह संबंधित यंत्रणांच्या अधिकाऱ्यांची बैठक मंगळवारी (२७ सप्टेंबर) बोलावली आहे. त्यामध्ये उड्डाणपूल पाडल्यानंतर करावयाच्या कार्यवाहीचे नियोजन करण्यात येणार आहेचांदणी चौकातील कोंडीवर उपाययोजना करण्यासाठी एनएचएआयने या ठिकाणचा जुना उड्डाणपूल पाडण्याचे नियोजन केले आहे. हे काम नोएडा येथील जुळे मनोरे पाडणाऱ्या दिल्लीतील कंपनीला देण्यात आले आहे. त्यानुसार या कंपनीकडून उड्डाणपूल पाडण्याआधीची पूर्वतयारी करण्यात आली आहे. उड्डाणपूल पाडण्यासाठी आवश्यक तयारी पूर्ण झाली असून पाऊसही थांबला आहे. त्यामुळे २ ऑक्टोबरला पूल पाडण्याचे निश्चित झाले आहे.
याबाबत बोलताना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख म्हणाले, ‘उड्डाणपूल पाडण्यासाठी नियंत्रित स्फोट करण्यात येणार आहे. त्यामुळे परिसरातील निवासी भागातील नागरिकांचे तात्पुरते स्थलांतर करावे लागणार आहे. तसेच पर्यायी वाहतुकीचे नियोजन करावे लागणार आहे. याशिवाय उड्डाणपूल पाडल्यानंतर पडणारा राडारोडा उचलण्यासाठी आवश्यक व्यवस्था, ऐनवेळी येणाऱ्या समस्या यांचे निवारण करण्यासाठी एनएचएआय, उड्डाणपूल पाडणारी कंपनी, वाहतूक पोलीस यांची एकत्रित बैठक मंगळवारी बोलावण्यात आली आहे. त्यामध्ये सर्वंकष नियोजन केले जाईल. उड्डाणपूल पाडण्यापूर्वी माध्यमांसह, समाजमाध्यमांतून व्यापक प्रसिद्धी देण्यात येईल, जेणेकरून या ठिकाणाहून दररोज प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना त्रास होणार नाही.’
दरम्यान, चांदणी चौकात दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. उड्डाणपूल पाडल्यानंतर पर्यायी मार्गाने येथील वाहतूक वळविण्यात येणार आहे. उड्डाणपूल सकाळी पाडल्यास बघ्यांची गर्दी, येथील वाहूतक आणि नागरी भाग लक्षात घेता हा पूल रात्री पाडण्याचे निश्चित झाले आहे. १ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री किंवा २ ऑक्टोबरला पहाटे पूल पाडण्यात येणार आहे.
उड्डाणपूल पाडण्यासाठीची आवश्यक स्फोटके आज पुण्यात
उड्डाणपूल पाडण्यासाठी नियंत्रित स्फोट करण्यात येणार आहे. त्याकरिता या उड्डाणपुलाला यापूर्वीच छिद्रे पाडण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. उड्डाणपूल पाडण्यासाठी आवश्यक स्फोटके शनिवारी पुण्यात दाखल होणार आहेत, असेही प्रशासनाकडून सांगण्यात आले.