पुणे : अयोध्या येथील प्रभू श्रीराम मंदिरातील रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आणि मंदिर लोकार्पणनिमित्त शहरात निमंत्रण संपर्क अभियान राबविण्यात आले असतानाच आता हडपसर परिसरातील श्रीरामांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा शनिवारी होणारा पायाभरणी समारंभ चर्चेचा ठरला आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून यानिमित्ताने मतांची पायाभरणी करण्यात येत असल्याचेही दिसून येत आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अयोध्या येथील श्रीराम मंदिराचा मुद्दा प्रचाराचा भाग ठरण्याची शक्यता आहे. गेल्या काही वर्षांपासून प्रभू श्रीरामांच्या नावाने राजकारणही केले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २२ जानेवारी रोजी अयोध्या येथील श्रीराम मंदिराचे लोकार्पण झाल्यानंतर लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईल, अशी चर्चा असतानाच पुण्यातील श्रीरामांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या पायाभरणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
हेही वाचा – पुणे : संकल्प विकास यात्रेत ‘कसब्या’ला प्राधान्य?
हडपसर परिसरातील हांडेवाडी येथे प्रभू श्रीराम यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येणार आहे. शिसेनेचे माजी नगरसेवक प्रमोद उर्फ नाना भानगिरे यांनी तसा प्रस्ताव २०१८ मध्ये महापालिकेला दिला होता. या खर्चाला महापालिकेने मान्यता द्यावी, असे या प्रस्तावात भानगिरे यांनी नमूद केले होते. महंमदवाडी-कौसरबागमधील हांडेवाडी येथे हा पुतळा उभारण्याचे नियोजित होते. या प्रस्तावाला स्थायी समितीने आणि त्यानंतर महापालिकेच्या मुख्य सभेने मान्यता दिली होती. मात्र, सार्वजनिक ठिकाणी पुतळा उभारावयाचा झाल्यास त्यासाठी राज्य शासनाच्या नगरविकास विभागाची मान्यता घेणे आवश्यक असल्याने महापालिकेकडून हा प्रस्ताव राज्य शासनाच्या नगरविकास विभागाला पाठविण्यात आला होता. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना प्रस्ताव रखडला होता. सत्तासमीकरणे बदलल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार राज्यात आले आणि रखडलेल्या या प्रस्तावाला गती मिळाली. नगरविकास विभागाने महापालिकेला पुतळा उभारण्याचे आदेश दिले. त्यानुसार पुतळ्याचा पायाभरणी समारंभ शनिवारी होणार आहे.
हडपसर हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. श्रीराम पुतळा उभारणीचा प्रस्ताव देणारे शिवसेनेचे (शिंदे गट) शहरप्रमुख नाना भानगिरे या मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. या मतदारसंघात कोंढवा, महंमदवाडी-कौसरबाग मुस्लिम बहुल भाग आहे. राज्यात सध्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे केला जात आहे. त्यादृष्टीने भानगिरे यांनी मतांची पायाभरणी करण्यासाठी पुतळा उभारणीसाठी मोठा कार्यक्रम आयोजित केल्याची चर्चा आहे.
हेही वाचा – पुणेकरांना दिलासा : मिळकतकरात ४० टक्के सवलत मिळण्यासाठी आता केव्हाही अर्ज करा!
नामकरणाची मागणी
राज्यातील सत्ताबदलानंतर शहरांची नावे बदलण्याचे लोण हडपसरपर्यंत पोहोचले आहे. हडपसर विधानसभा मतदारसंघातील महंमदवाडी उपनगराचे नाव महादेववाडी करण्याच्या हालचालीही शिवसेनेकडून सुरू झाल्या आहेत. भानिगरे यांनी तशी मागणी केल्यानंतर आमदार भरत गोगावले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तसा प्रस्ताव दिला आहे. नामांतर आणि श्रीराम पुतळ्याच्या उभारणीतून मतांचे राजकारण करण्याचा शिवसेनेचा खटाटोप सुरू असल्याचे चित्र आहे.
धनकवडीतील शिल्प उभारणीचा प्रस्ताव रखडला
भाजपाच्या महापालिकेतील सत्ताकाळात माजी नगरसेविका वर्षा तापकीर यांनी धनकवडी-आंबेगाव पठार येथे प्रभू श्रीरामांचे शिल्प उभारणीचा प्रस्ताव दिला होता. मात्र क्रीडांगणाच्या जागेवर प्रस्ताव उभारण्यात येणार असल्याने त्यावरून वाद झाला होता. भाजपाची एकहाती सत्ता असल्याने हा प्रस्ताव मान्य करून त्यासाठी दोन कोटी रुपयांचा खर्च करण्यास मान्यता देण्यात आली होती. त्यानंतर सभागृहाची मुदत संपल्याने या प्रस्तावावर कार्यवाही होऊ शकली नाही.