पुणे : जी २० देशांतील उद्याचे नेतृत्व करणाऱ्या शहरांना सर्वतोपरी स्वयंपूर्ण बनवण्याच्या उद्देशाने विचारमंथन आणि कृती करण्याचे ध्येय डोळ्यांसमोर ठेवून उद्यापासून जी-२० परिषदेला सुरुवात होत आहे. भारतासह ऑस्ट्रेलिया आणि ब्राझिल यांच्यातर्फे या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयातील आर्थिक व्यवहार विभागाचे सहसचिव सोलोमोन आरोकीयाराज यांनी रविवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
बैठकीचे उद्घाटन केंद्रीय सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या हस्ते होईल. गुंतवणुकीच्या विविध पैलूंवर चर्चा करण्याबरोबरच दर्जेदार पायाभूत सुविधा उभारणे, गुंतवणुकदारांसाठी अशा सुविधांचे पर्याय उपलब्ध करून देणे, त्यासाठी आवश्यक आर्थिक गुंतवणूक आणणे, या उद्देशाने जी २० सदस्य देश आणि इन्फ्रास्ट्रक्चर वर्किंग ग्रुप यांमध्ये या परिषदेत चर्चा होणार आहे.
हेही वाचा – पुणे : संक्रातीला चोरट्यांचा धुमाकूळ, महिलेचे सव्वातीन लाखांचे दागिने हिसकावले
सोलोमोन आरोकीयाराज म्हणाले, यंदाच्या परिषदेसाठी ‘एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य’ अशी मध्यवर्ती संकल्पना निश्चित करण्यात आली आहे. पुणे येथे होणाऱ्या परिषदेत शहरांचा विकास हे सामाईक लक्ष्य असून उद्याच्या आव्हानांसाठी ही शहरे सर्वसमावेशक, लवचिक आणि शाश्वत करणे हा चर्चेचा केंद्रबिंदू ठरणार आहे.
शहरांना आर्थिक विकासाची केंद्रे बनवणे, शहरी पायाभूत सुविधांना वित्तपुरवठा करणे, भविष्यातील आव्हानांसाठी सज्ज करणे, शहरी पायाभूत सुविधा निर्माण करणे, ऊर्जा सक्षम आणि पर्यावरणीयदृष्ट्या शाश्वत पायाभूत सुविधांसाठी खासगी वित्तपुरवठा उघडण्यासाठी वित्तीय गुंतवणुकीचे निर्देश देणे आणि सामाजिक असंतुलन कमी करणे, अशा विविध पैलूंवर या निमित्ताने काम केले जाणार आहे.
हेही वाचा – राज्यात हुडहुडी आणखी वाढणार, उत्तरेकडे थंडीची लाट, राजस्थानात उणे तापमान
आंध्र प्रदेश, पंजाब, तामिळनाडू, केरळ, तेलंगणा, गुजरात, महाराष्ट्र, छ्तीसगड आणि हिमाचल प्रदेश या राज्यांतील महापालिकांचे ३०० अधिकारीही या परिषदेत सहभागी होणार आहेत. अनेक बैठका, चर्चा, विचारमंथन यांच्याबरोबरच वृक्षारोपण, सहभोजन, पुणे शहराचा हेरिटेज वॉक, महाबळेश्वर या नजिकच्या पर्यटन स्थळाला भेट, असा भरगच्च कार्यक्रम यानिमित्ताने आखण्यात आला आहे.