लेखी परीक्षेत किमान गुण निश्चित करण्याचा प्रस्ताव शासनाने फेटाळला
गेली काही वर्षे दहावी, बारावीच्या निकालाला येणारा ‘फुगवटा’ या वर्षीही कायम राहणार असल्याचे स्पष्ट झाले असून लेखी परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी किमान गुण निश्चित करण्याचा राज्य मंडळाचा प्रस्ताव शासनाने फेटाळला असल्याची माहिती राज्याचे शालेय शिक्षण प्रधान सचिव नंदकुमार यांनी सोमवारी माध्यमांशी बोलताना दिली. त्यातच क्रीडा गुणांचाही आधार विद्यार्थ्यांना मिळणार आहे.
राज्य मंडळाने २० गुणांचे अंतर्गत मूल्यमापन आणि ८० गुणांची लेखी परीक्षा अशी गुणांची वर्गवारी केली. मात्र परीक्षेत उत्तीर्ण होण्याचा निकष बदललाच नाही. लेखी आणि तोंडी परीक्षेत मिळून ३५ गुण मिळवणेच विद्यार्थ्यांसाठी पुरेसे असते. त्यातही ग्रेस गुणांचा आधार असतो. त्यामुळे तोंडी परीक्षेत अगदी पैकीच्या पैकी गुण आणि लेखी परीक्षेत पाच-दहा गुण अधिक ग्रेस गुण असे गणित साधून दहावी-बारावीचे विद्यार्थी सहज उत्तीर्ण होतात. या पद्धतीमुळे गेली दोन वर्ष दहावी, बारावीच्या निकालाचे नवे नवे उच्चांक मिळत आहेत. त्यामुळे पुढील प्रवेशाची गणितेही दोन वर्षांपासून बदललेली आहेत.
निकालाच्या या फुगवटय़ाच्या पाश्र्वभूमीवर उत्तीर्ण होण्यासाठी लेखी परीक्षेत किमान गुणांचा निकष ठेवण्याची मागणी करण्यात येत होती. दहावी, बारावीच्या परीक्षा घेणाऱ्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानेही याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला होता. मात्र शासनाने तो प्रस्ताव फेटाळला आहे, अशी माहिती नंदकुमार यांनी माध्यमांशी बोलताना सोमवारी दिली.
‘राज्य मंडळाने पाठवलेला किमान गुणांचा प्रस्ताव हा आधीच्या शासनाने त्यांची मुदत संपत असताना घाईत घेतलेला निर्णय होता. मात्र या शासनाला तो योग्य वाटला नाही. त्यामुळे तो फेटाळण्यात आला,’ असेही शालेय शिक्षण प्रधान सचिव नंदकुमार यांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा