पुणे : धूम्रपान करणाऱ्यालाच नव्हे, तर धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींच्या सहवासातील व्यक्तीलाही कर्करोगाची जोखीम सर्वाधिक असते. या ‘पॅसिव्ह स्मोकिंग’बाबत ‘द लॅन्सेट’ या वैद्यकीय नियतकालिकाने याबाबतचा शोधनिबंध नुकताच प्रसिद्ध केला असून कर्करोग होण्यामागच्या दहा सर्वात प्रमुख कारणांमध्ये ‘पॅसिव्ह स्मोकिंग’चा समावेश असल्याचे लॅन्सेटने आपल्या शोधनिबंधात म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 कर्करोग आणि धूम्रपान यांचा थेट संबंध असल्याने कर्करोगाचा धोका टाळण्यासाठी धूम्रपान बंद करण्याचे आवाहन तज्ज्ञ डॉक्टरांकडून वेळोवेळी केले जाते. धूम्रपानाचा त्रास हा केवळ स्वत: धूम्रपान करणाऱ्यांपुरताच मर्यादित नसून धूम्रपान करणाऱ्यांच्या धुराच्या संपर्कात येणाऱ्यांनाही असल्याचे लॅन्सेटने प्रसिद्ध केलेल्या माहितीवरून स्पष्ट झाले आहे. ‘ग्लोबल बर्डन ऑफ डिसिज, इंज्युरीज अँड रिस्क फॅक्टर्स (जीबीडी) २०१९’ या अभ्यासातील निष्कर्षांनुसार २०१९ मध्ये मृत्यू आणि प्रकृती अस्वास्थ्यास कारणीभूत २३ प्रकारच्या कर्करोगांना कारणीभूत घटकांचा अभ्यास करण्यात आला. त्या वेळी धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींच्या सहवासात येणाऱ्या व्यक्तींच्या फुप्फुसांमध्ये सिगरेटचा धूर गेल्याने त्यांनाही कर्करोगाचा धोका निर्माण होतो. धूम्रपान, मद्यपान आणि स्थूलपणा ही कर्करोग होण्याची प्रमुख कारणे आहेत. त्यानंतर असुरक्षित लैंगिक संबंध, रक्तशर्करेचे सातत्याने अधिक प्रमाण, वायू प्रदूषण ही कारणेही कर्करोगास कारणीभूत आहेत. मात्र, धूम्रपान करणाऱ्यांच्या सहवासातील व्यक्तींना कर्करोगाचा धोका लक्षणीय आणि गंभीर आहे. अमेरिकेतील सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अ‍ॅण्ड प्रिव्हेन्शन या संस्थेने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार धूम्रपान करणाऱ्यांच्या संपर्कातील व्यक्तींच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींच्या फुप्फुसात जाणाऱ्या धुरामध्ये सात हजार प्रकारची रसायने असतात. त्यापैकी शेकडो रसायने ही विषारी असतात तर ७० रसायने कर्करोग होण्यास कारणीभूत असतात. त्यामुळे स्वत: धूम्रपान न करणाऱ्या मात्र धूम्रपान करणाऱ्यांच्या संपर्कात येणाऱ्यांना कर्करोग होण्याचा धोका २० ते ३० टक्केपर्यंत असतो.

२५ लाख व्यक्तींचा मृत्यू..

धूम्रपान करणाऱ्यांच्या संपर्कातील १९६४ पासून सुमारे २५ लाख व्यक्ती कर्करोगाने दगावल्याचे सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अ‍ॅण्ड प्रिव्हेन्शन या संस्थेकडून सांगण्यात आले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The highest risk cancer passive smoking bhakti bisure ysh
Show comments